‘ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीमध्ये माझी बहीण कु. अंजली कानस्कर रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेली होती. तेव्हा ती स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेच्या अंतर्गत व्यष्टी साधनेच्या आढाव्याला आणि भाववृद्धी सत्संगाला जात होती, नोव्हेंबर २०२३ मध्ये मी आणि अंजलीताई २ मासांसाठी घरी गेलो होतो. घरी असतांना मला ताईमध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. व्यष्टी साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे
घरी आल्यावर ती ‘सकाळी लवकर उठून आध्यात्मिक स्तरावरील उपाय पूर्ण करणे, थोड्या थोड्या वेळाने त्रासदायक शक्तीचे आवरण काढणे, अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे, भावजागृतीचे प्रयोग करणे, स्वतःकडून झालेल्या चुका विचारणे, स्वयंसूचना सत्र करणे अन् रात्री झोपण्यापूर्वी सारणी लिखाण करणे’, हे प्रयत्न नियमितपणे आणि गांभीर्याने करत होती. ताईला तिची चूक सांगितल्यावर ती सहजतेने स्वीकारायची आणि ‘पुढे अशी चूक न होण्यासाठी मी प्रयत्न करीन’, असे सांगायची.
२. चुकांसाठी प्रायश्चित्त घेऊन त्याचे कटाक्षाने पालन करणे
एकदा ताईने ४ दिवस बाहेरचा खाऊ न खाण्याचे प्रायश्चित्त घेतले. दुसर्या दिवशी आम्ही दोघी बाहेर गेलो होतो. तेव्हा मी दुकानातून खाऊ घेतला आणि ताईलाही त्याविषयी विचारले, तसेच त्यासाठी तिला आग्रहही केला. त्या वेळी तिने ‘माझे प्रायश्चित्त आहे. मला नको’, असे सांगितले आणि कुठलाच खाऊ घेतला नाही.
३. स्वतःला पालटण्याची तळमळ
काही वेळा एखाद्या प्रसंगामुळे ताईची मनःस्थिती बरी नसायची किंवा तिची चिडचिड व्हायची. तेव्हा ती आश्रमात झालेल्या व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील सूत्रे आठवायची आणि त्यानुसार प्रसंग स्वीकारण्यासाठी प्रयत्न करायची. ‘माझी चिडचिड होत आहे. मला प्रसंग स्वीकारायला जमत नाही. मी काय प्रयत्न करू ?’, असे ती मला विचारायची.
४. जेव्हा ताई हे प्रयत्न नियमितपणे करायची, तेव्हा तिचा चेहरा एरव्हीपेक्षा अधिक आनंदी दिसायचा.
‘हे गुरुदेवा, ‘अंजलीताईमध्ये जाणवलेले पालट आपणच माझ्याकडून लिहून घेतले’, याबद्दल तुमच्या चरणी कृतज्ञता !’
– कु. शर्वरी कानस्कर (कु. अंजली हिची लहान बहीण, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.३.२०२४)