जागतिक अर्थकारणामध्ये सद्यःस्थितीत अमेरिका ही सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असून दुसर्या स्थानावर चीनचा क्रमांक लागतो. तथापि वर्ष २०४९ पर्यंत चीनला जगातील सर्वांत मोठी आर्थिक महाशक्ती बनायचे आहे. शी जिनपिंग चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर वर्ष २०१२ मध्ये चीनने एक व्यापक योजना आखली असून त्यासाठी वर्ष २०२३, २०३५ आणि २०४९ असे टप्पे आखण्यात आले आहेत. अमेरिकेच्या आर्थिक स्थानाला हादरा देण्यासाठी चीनने अलीकडील काळात ‘डी-डॉलरायजेशन’च्या (‘डॉलर’ या अमेरिकेच्या चलनाऐवजी चीनने स्वतःचे चलन ‘युआन’ आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकाधिक वापरणे) अमेरिकेच्या प्रवाहामध्ये आघाडी घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत डॉलरच्या माध्यमातून होणारे जागतिक व्यवहार कमी कसे करता येतील, यासाठी चीनचा आटापिटा चालू आहे. यातून डॉलरची आंतरराष्ट्रीय अर्थकारणातील जी मक्तेदारी आहे, ती चीनला संपुष्टात आणायची असून त्याजागी ‘युआन’ या आपल्या राष्ट्रीय चलनाचे मोल चीनला वाढवायचे आहे. अलीकडील काळात झालेल्या ‘युआन’च्या अवमूल्यनामुळे चीनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ‘कोविड’ महामारीनंतर गटांगळ्या खाऊ लागलेली चीनची अर्थव्यवस्था अद्यापही पूर्ववत् झालेली नाही. चीनमध्ये मागणी कमालीची घटलेली आहे. औद्योगिकीकरणाचे चक्रही पूर्वस्थितीत आलेले नाही. चीनच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणारा बांधकाम उद्योग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अशी सर्व चिंताजनक स्थिती असतांना चीन प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत असल्याचे गेल्या ३ मासांमध्ये दिसून आले आहे.
लेखक : डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
१. चीनची सोने खरेदी
चीनने केवळ मार्च मासात ५ टन सोन्याची आयात केली आहे. चालू वर्षातील पहिल्या ३ मासांचा विचार करता चीनने तब्बल २७ टन सोने खरेदी केले आहे. परिणामी सद्यःस्थितीत चीनकडे एकूण २ सहस्र २६२ टन सोन्याचा साठा आहे. चिनी गुंतवणूकदारांनीही सोन्यामध्ये गुंतवणूक वाढवली आहे. चीन अचानकपणाने इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करू लागल्यामुळे जगभरातील सोन्याच्या किमतीही प्रभावित झाल्या आहेत. सोन्याने पहाता पहाता ७० सहस्र रुपयांपर्यंत मजल मारल्यामुळे सोन्यातील गुंतवणूकदारांमध्ये आनंद असला, तरी नव्याने सोने खरेदी करणार्यांची काहीशी निराशा झाली आहे. वर्ष २०१४ ते २०२४ या १० वर्षांचा कालखंड पाहिल्यास आजघडीला सोन्याचे भाव दुपटीहून अधिक आहेत. या भाववाढीला चीनकडून होणारी वारेमाप खरेदी हे एक कारण आहे; पण याविषयी चिंताही व्यक्त होत आहे.
२. चिंतेचे कारण काय ?
या चिंतेस पार्श्वभूमी आहे ती ‘कोविड’पूर्व कालखंडाची. कोरोना महामारीचा उद्रेक जगभरात होण्यापूर्वी चीनने संपूर्ण जगभरामधून वैद्यकीय साधने आणि ‘पीपीई किट’ यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. त्या वेळी त्याचे महत्त्व कुणाही देशाला उमगले नव्हते किंवा त्याकडे लक्षही गेले नव्हते; परंतु कोरोनाचा संसर्ग जसजसा वाढत गेला, तसतसे चीनच्या या खरेदीचे रहस्य जगाच्या लक्षात आले. त्यामुळेच आता चीन जेव्हा अभूतपूर्व पातळीवर सोन्याची खरेदी करू लागला आहे, तेव्हा येणार्या काळातील काही धोक्यांची चीनला चाहूल लागली आहे का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे; कारण सोन्याचा साठा हा कोणत्याही राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा भक्कम आधार मानला जातो. कोणत्याही चलनाचे मूल्य प्रामुख्याने त्या राष्ट्राकडे असलेल्या सोन्याच्या साठ्यावर ठरते. एखादी आपत्ती येते, तेव्हा या चलनाचे अवमूल्यन होते. अवमूल्यन झाल्यामुळे विनिमयाचे पुष्कळ सारे प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी राष्ट्र आणि नागरिक यांच्याकडून सोन्यावर गुंतवणूक होते. सोने हे वैयक्तिक पातळीवर जसे आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारे असते, तशाच प्रकारे राष्ट्रासाठीही सोन्याचा साठा हा आर्थिक सुरक्षा देणारा असतो. भारताचे उदाहरण घेतल्यास गेल्या ४ ते ५ मासात रिझर्व्ह बँकेनेही साधारण १४ टन सोन्याची खरेदी केलेली आहे. गेल्या काही वर्षांतील ही सर्वाधिक मोठी खरेदी मानली जाते. हे करण्यामागचे कारणही जागतिक स्तरावर निर्माण झालेली कमालीची असुरक्षितता आणि अस्थिरता हेच आहे. अशा प्रतिकूल वातावरणातील व्यवस्थापनाची रणनीती म्हणून सोन्याच्या साठवणुकीकडे पाहिले जाते.
आज रशिया-युक्रेन युद्ध साधारण २ वर्षे उलटूनही ते संपण्याचे नाव घेत नाही. कोरोना महामारीचा परिणाम अजूनही जागतिक पातळीवर आजही पुरवठा साखळी बर्यापैकी विस्कळीत झालेली आहे. अनेक देशांच्या चलनाचे अवमूल्यन झालेले आहे. या मधल्या काळात आखातातील परिस्थितीही अस्थिर झालेली आहे. इस्रायलकडून इराणवर अद्यापही प्रतिआक्रमण झालेले नाही. जग या प्रत्युत्तराची वाट बघत आहे; कारण इराणने पहिल्यांदा इस्रायलवर क्षेपणास्त्र आक्रमण केले. त्यामुळे आखातामधील परिस्थिती स्फोटक बनली आहे. वैश्विक पटलावरच्या या वाढत्या असुरक्षिततेमुळे केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील अनेक राष्ट्रे सोन्याची खरेदी करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षण सामुग्रीच्या खरेदीप्रमाणे राष्ट्रांचा कल हा प्रामुख्याने सोने खरेदीकडे वाढलेला आहे. अनेक इस्लामिक देश, लॅटीन अमेरिकेतील देश, आफ्रिकन देश, विकसनशील आणि गरीब देश सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतांना दिसून येत आहेत. याचा परिणाम सोन्याचे भाव वधारण्यावर झाला आहे.
३. अमेरिका-चीन संघर्षाचे कारण
असे असले, तरी चीनच्या सोने खरेदीमागे आर्थिक सुरक्षिततेसह अन्य एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे प्रारंभीला म्हटल्यानुसार डॉलरला शह देणे. आशिया खंडामध्ये आजघडीला सोन्याची सर्वाधिक आयात करणारा देश आहे चीन; पण गेल्या २ वर्षांमध्ये चीनकडून सोन्याची खरेदी तब्बल ३० टक्क्यांनी वाढलेली आहे. यामागे प्रामुख्याने अमेरिका आणि चीन यांच्यातील संघर्षाचे महत्त्वाचे कारण आहे. आता हा संघर्ष केवळ संरक्षण किंवा सामुग्री पातळीवर राहिलेला नसून तो आर्थिक पातळीवर येऊन थांबलेला आहे. डॉलर हा अमेरिकेच्या एकूणच सामर्थ्याचा मुख्य स्रोत आहे. डॉलरच्या माध्यमातून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय अर्थकारणासह राजकारणावरही दबदबा निर्माण केलेला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी प्रामुख्याने चीन सिद्धता करत आहे. ते आव्हान देतांना युआनच्या माध्यमातून व्यापार वाढवायचा, हे चीनचे उद्दिष्ट आहे. यामध्ये इतर देशांनाही युआनच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी चीन प्रवृत्त करत आहे.
चीनला प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा करून त्याच्या आधारावर युआनची किंमत वाढवायची आहे आणि अमेरिकेला आव्हान द्यायचे आहे. कोरोना महामारीनंतर ज्या पद्धतीने अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये चीनविषयी विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे चीनवर किती विश्वास ठेवायचा ? चीनवर किती अवलंबून रहायचे ? याविषयी जग पुनर्विचार करू लागले आहे. अशा स्थितीत चीनला त्याची गेलेली पत पुन्हा मिळवायची असेल आणि डॉलरला खर्या अर्थाने आव्हान द्यायचे असेल, तर त्याला युआनचे मूल्य प्रचंड वाढवावे लागणार आहे. युआनमधून होणारा व्यापारही वाढवावा लागणार आहे. त्यामुळे चीनने सोन्याची खरेदी प्रचंड प्रमाणात वाढवल्याचे दिसत आहे.
सद्यःस्थितीत अनेक देशांच्या केंद्रीय बँका मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने रशिया आणि चीन या दोन देशांच्या केंद्रीय बँका अग्रेसर आहेत. ‘पीपल्स बँक ऑफ चायना’ या चीनच्या सरकारी बँकेने गेल्या १७ मासांमध्ये ‘रेकॉर्ड ब्रेक’ (विक्रमी), म्हणजे साधारण २ सहस्र टन सोन्याची खरेदी केलेली आहे. ‘पीपल्स बँक ऑफ चायना’च्या परकीय गंगाजळीमध्ये सोन्याचा हिस्सा चीनला वाढवायचा आहे.
४. अमेरिकन निर्बंधांची भीती
चीनला येणार्या काळामध्ये तैवानच्या एकीकरणाची प्रक्रिया पुढे न्यायची आहे. यासाठी ‘प्रसंगी लष्करी बळाचा वापर करण्यासही आपण मागे पुढे पाहणार नाही’, हे शी जिनपिंग यांनी चालू वर्षाच्या प्रारंभीला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणामध्ये स्पष्ट केले आहे. यामध्ये ‘कोणत्याही राष्ट्राने हस्तक्षेप केल्यास त्याची गय केली जाणार नाही’, हेही चीनने बजावले आहे. तथापि चीनला एक महत्त्वाची भीती आहे, ती म्हणजे युक्रेन युद्धानंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे रशियावर ५ सहस्रांहून अधिक आर्थिक निर्बंध घातले, तशाच प्रकारे तैवानवर आक्रमण केल्यास आपल्याविरुद्धही असे निर्बंध घातले जाऊ शकतात. त्या काळासाठीची पूर्वसिद्धता म्हणून चीन सोन्याची खरेदी वाढवत आहे.
५. ‘रिअल इस्टेट’मधील (स्थावर मिळकतमधील) पडझड
आशिया खंडात मागच्या वर्षापर्यंत भारत हा सोन्याच्या आयातीमध्ये अव्वल स्थानी होता; परंतु आता चीनने यामध्ये बाजी मारल्याचे दिसून येत आहे. खरे तर चीन हा सोन्याचा मोठ्या प्रमाणात निर्माताही आहे. असे असूनही चीनने सोन्याची आयात वाढवलेली आहे. चिनी लोकांची गुंतवणूकही प्रामुख्याने सोन्यामध्ये वाढलेली आहे; कारण चिनी लोकांना गुंतवणुकीचे पर्याय फार मर्यादित स्वरूपात आहेत. आजवर त्यांची गुंतवणक ही प्रामुख्याने ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रामध्ये होती; कारण त्यांना परदेशांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक निर्बंध आहेत. चिनी नागरिक परदेशात किती रकमेपर्यंत गुंतवणूक करू शकतात, यावर चीनच्या सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे तेथील नागरिक ‘रिअल इस्टेट’ क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पैसे गुंतवत असत; पण कोरोना महामारीनंतर चीनमधील बांधकाम उद्योग कोसळला आहे. याचाही परिणाम चिनी लोकांच्या सोन्याच्या गुंतवणुकीवर झालेला दिसत आहे. (११.५.२०२४)
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)