काँग्रेस सरकारने राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केला ! – अनिल खंवटे, उद्योजक, गोवा
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारने डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणावरून त्या वेळी जे काही वक्तव्य केले, ते अयोग्य होते. १० मे या दिवशी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यावरून हे सिद्ध झाले आहे. काँग्रेस सरकारने राजकीय सूडबुद्धीने हा प्रकार केला आहे. डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी तिघांची निर्दाेष सुटका झालेली आहे, तर अन्य दोघांच्याही नातेवाइकांनी वरच्या न्यायालयात अर्ज केल्यावर अन्य दोघांचीही निर्दाेष सुटका होईल. मी सनातन संस्कृती मानतो. सनातन संस्था सनातन धर्माचे रक्षण करण्याचे, तसेच हिंदुत्वनिष्ठांना पाठिंबा देण्याचे महान कार्य करत आहे. त्यांच्या कार्यासाठी मी पुष्कळ शुभेच्छा !
दाभोलकर हत्या प्रकरणात शवविच्छेदन आदी गोष्टींचा विचार करता आजही अनेक प्रश्न अनुत्तरित ! – श्री. सिद्धराम पाटील, उपसंपादक, दिव्य मराठी, सोलापूर
दाभोलकर हत्या प्रकरणी आलेल्या निकालावर समाधान मानणे शक्य नाही. तपासापूर्वीच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘अन्वेषणाची दिशा कोणती असली पाहिजे ?’ यावर भूमिका मांडली होती. मारेकरी शोधण्यापेक्षा त्यांना या घटनेचे राजकारण करायचे होते. पंचनामा स्थळाच्या नोंदी, शवविच्छेदन अहवाल, ‘फॉरेन्सिक’ अहवाल या सर्व गोष्टींचा विचार करता आजही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयात वेगळाच निकाल पुढे आल्यास आश्चर्य नको.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मनीष नागोरीने विकास खंडेलवाल याला दिलेले पिस्तूल आणि दाभोलकर यांच्या शरिरात सापडलेली गोळी जुळल्याचा ‘बॅलेस्टिक एक्स्पर्ट’चा अहवाल यामुळे संपूर्ण निकाल फिरू शकतो. गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे; पण ज्यांना शिक्षा होईल, ते गुन्हेगारच असले पाहिजेत. (मृत व्यक्तीच्या) वैचारिक विरोधकांना अन्वेषणापूर्वीच दोषी ठरवून त्या दिशेने अन्वेषण केल्यास खरे गुन्हेगार मोकाट सुटण्याची शक्यता अधिक असते. अन्वेषण कामात राजकारण्यांचे हितसंबंध असतात, तेव्हा अन्वेषण आणि निकाल भरकटण्याची शक्यता वाढते. उच्च न्यायालयात वस्तूस्थिती समोर येईल आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे वाटते.
हा निकाल म्हणजे शहरी नक्षलवादी शक्तींना भीमटोला ! – प्राचार्य सुभाष वेलिंगकर, राज्य निमंत्रक, हिंदू रक्षा महाआघाडी, गोवा
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्याच्या दीड-दोन घंट्यांतच काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ‘दाभोलकर हत्या प्रकरणी हिंदुत्वनिष्ठांचा हात आहे’, असे घाईघाईने घोषित केले. सनातन संस्थेला या हत्येमध्ये गोवण्याचा निंद्य प्रयत्न केला गेला. न्यायालयाने १० मे या दिवशी सनातन संस्था, तसेच श्री. विक्रम भावे आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना संषूर्ण निर्दोष ठरवून दिलेल्या निवाड्यामुळे शहरी नक्षलवादी शक्तींना भीमटोला लगावला गेला आहे.
‘भगवा आतंकवाद’ ही संकल्पना सार्थ ठरवण्यासाठी विक्रम भावे यांना २ वर्षे, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ८ वर्षांचा आणि हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ४२ दिवसांचा नाहक कारावास तपास चुकीच्या दिशेने नेल्यामुळे भोगावा लागलेला आहे, त्याचा हिंदू रक्षा महाआघाडी तीव्र धिक्कार करते. हिंदुत्वविरोधक आणि शहरी नक्षलवादी यांनी रचलेल्या षड्यंत्रातून तावून सुलाखून निर्दोष बाहेर आल्याबद्दल हिंदू रक्षा महाआघाडी सनातन परिवाराचे हार्दिक अभिनंदन करत आहे.
सनातनच्या साधकांना गोवण्याचा प्रकार निषेधार्हच ! – रमेश नाईक, माजी शिवसेना प्रमुख, गोवा राज्य
सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते दुसर्याची हत्या करण्यासारखे वाईट कृत्य कधीच करू शकत नाहीत. जी संस्था धर्मरक्षण आणि आधात्मिक ज्ञान देणे, तसेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी झटणे, हे कार्य करते, तिचे साधक वाईट कृत्य कसे करू शकतात ? अशा साधकांना कारागृहात टाकणे योग्य आहे का ? डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी गोवण्यात आलेल्या साधकांचा ८ ते १० वर्षांचा वाया गेलेल्या काळाची आता भरपाई कोण करणार ? सनातनच्या साधकांना अकारण डॉ. दाभोलकर हत्येच्या प्रकरणी गोवण्याच्या प्रकाराचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. साधकांना त्रास देण्यासाठी हेतूपुरस्सर केलेला हा प्रयत्न आहे.