Dabholkar Murder Case Verdict : पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता होणार, हे निश्‍चित होते ! – विक्रम भावे, सनातन संस्था

श्री. विक्रम भावे

पुणे, १० मे (वार्ता.) –  न्यायालयाने आज माझी निर्दोष मुक्तता केली. माझ्या दृष्टीने अपेक्षितच निकाल होता. मला अटक करतांना चुकीच्या पद्धतीने केली होती. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे न्यायालयासमोर कोणते पुरावे आले नाहीत. निर्दोष मुक्तता होणार, हे निश्‍चित होते. आज ती प्रत्यक्षात झाली, माझ्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे, सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे यांनी दिली.

मला अटक करतांनाच सीबीआयच्या अधिकार्‍याने मला सांगितले की, अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या विरोधात जर मी साक्ष द्यायला सिद्ध असेन, तरच ते मला सोडणार होते. अन्यथा ते मला अटक करणार होते; पण मी खोटी साक्ष द्यायला नकार दिल्याने या प्रकरणात त्यांनी मला अटक केली आणि रेकी केल्याचा आरोप त्यांनी माझ्यावर ठेवला; परंतु त्या दृष्टीने आजपर्यंत कोणताही पुरावा ते आणू शकले नाहीत. कित्येक वेळा ते शपथेवर असत्य बोलत राहिले की, माझ्या विरोधात पुरावे आहेत आणि माझ्या जामिनाला विरोध करत राहिले. प्रत्यक्षात जे असत्य होते, ते समोर आले आहे. एकही पुरावा माझ्याविरोधात समोर आला नाही.

माझ्या वडिलांचे निधन झालेले असतांनाही त्यांच्या अंत्यविधीसाठी अधिकार्‍यांनी अनुमती दिली नाही. मला उच्च न्यायालयाने जामीन देतांना अशी अट घातली होती की, हा खटला संपेपर्यंत मी पुणे जिल्ह्याच्या बाहेर जाऊ नये. माझे वडील गावी असतांनाच त्यांचे निधन झाले. मी एकुलता एक मुलगा असूनही मला त्यांच्या अंत्यविधीसाठी जाता आले नाही. मी त्यासाठी न्यायलयात अर्ज केला; परंतु त्याला अनुमती मिळायलाच तीन आठवडे लागले. त्यानंतर मी अन्य दिवसांचे विधी करू शकलो. यामध्ये पोलिसांनी जाणूनबुजून विलंब केला, असे म्हणता येणार नाही; कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. यामध्ये अर्ज दिल्यावर क्रमांक लागणे, त्यावर युक्तीवाद होणे असे आहे. हे सगळे होण्यात तेवढा वेळ गेला. अन्यथा ते लवकर होऊ शकले असते, असे मला वाटते.