आदर्श कर्मयोगी आणि क्षात्रधर्म साधनेचे प्रतीक भगवान परशुराम !

अक्षय्य तृतीयेला भगवान परशुरामांचे स्मरण करून त्यांची महती अनुभवा !

ब्राह्मशक्ती आणि क्षात्रसामर्थ्य यांनी शत्रूला पूर्णपणे पराभूत करायला समर्थ असलेला परशुराम !

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘अग्रतः चतुरोवेदाः पृष्ठतः सशरं धनुः । इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि ॥’

अर्थ : माझ्या (परशुरामाच्या) मुखात चारही वेदांचे ज्ञान आहे. माझ्या पाठीवर बाणाचा भाता आणि धनुष्य टांगले आहे. प्रसंगी मी ब्राह्मशक्तीने शापदग्ध करीन अन् क्षात्रसामर्थ्याने संहार करीन. दोन्ही शक्तींद्वारे शत्रूला पूर्ण पराभूत करायला मी समर्थ आहे.
(साभार : घनगर्जित, मे २००५)

भगवान परशुराम हे श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी सहावा अवतार आहेत. वैशाख शुक्ल तृतीया (१०.५.२०२४) या दिवशी परशुराम जयंती आहे. त्यानिमित्त आपण परशुरामांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना भावपूर्ण वंदन करूया !

चिरंजीव परशुराम !

सात चिरंजीवांत परशुरामचे स्थान अद्वितीय आहे. चिरंजीव परशुराम युगायुगांतून प्रगटल्याच्या साक्षी आहेत. रामायण आणि महाभारतकाली तो होताच. ‘कौरव पांडवांचे गुरु आचार्य द्रोण आणि त्यांचे गुरु परशुराम. अगदी अलीकडे समर्थ रामदासस्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही त्याचे दर्शन झाले होते, अशा आख्यायिका आहेत.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००५)

‘काळाला वळण लावणारा ‘परशुराम’ हा महापुरूष ! उन्मत्त आणि दुष्ट क्षत्रियांचा उच्छेदक ! अधम शासकांच्या जुलुम जबरदस्तीचा डोंब उसळला, त्या वेळी परशुरामाने शास्त्र बाजूला ठेवले आणि शस्त्र हाती घेतले. दुष्कृतांच्या निवारणासाठी आपला विद्युत्प्रभ परशू उगारला आणि अधमांचा नि:पात केला. मदोन्मत्त, बेगुमान हत्तीचे रक्त चाटून जबडा रंगवण्याची ईर्षा बाळगणार्‍या सिंहाप्रमाणे परशुधारी रामाने उन्मत्त शासकावर झेप घेतली. पहाता पहाता आपल्या परशूने त्यांचे मुडदे पाडले. कुरुक्षेत्राच्या तीर्थभूमीत उष्णोष्ण रक्ताचे पाच डोह भरले. सगळी पृथ्वी जिंकली आणि ती तृणासारखी सहज दानही दिली. विश्वजित यज्ञाने त्याची सांगता केली !

‘त्रेतायुगात सीता-स्वयंवराच्या वेळी श्रीरामाने शिवधनुष्य उचलताच ते मोडले. तेव्हा त्या ठिकाणी भगवान परशुराम आले आणि श्रीविष्णूच्या दोन अवतारांची समोरासमोर भेट झाली. द्वापरयुगात श्रीकृष्णाचे गुरुकुलातील शिक्षण पूर्ण झाले. तेव्हा भगवान परशुरामाने श्रीकृष्णाची भेट घेतली. दोन्ही वेळी त्या त्या युगांतील अनेक जिवांना दोन अवतारांची भेट पहायला मिळाली.’
– कु. सर्वमंगला मेदी (१६.२.२०१७)

भगवान परशुरामाची क्षेत्रे !

परशुराम गुहा, राजस्थान

त्रेतायुगात परशुराम अरावली पर्वतांच्या रांगेत आले होते. या ठिकाणी आल्यावर परशुरामाने हे स्थान आपल्या तपश्चर्येसाठी निवडले. त्याने तेथील डोंगरामध्ये आपला परशु जोरात मारला; कारण येथे एक ब्रह्मराक्षस रहायचा. त्याला घालवण्यासाठी त्यांनी असे केले. परशुरामांनी डोंगरात परशूचा (कुर्‍हाडीसारख्या शस्त्राचा) घाव घातल्याने त्या ठिकाणी डोंगर कापला गेला आणि तेथे गुहा निर्माण झाली. त्या गुहेमध्ये परशुराम शिवाच्या तपश्चर्येला बसला. त्याने शिवाची आराधना आरंभ केली. तेव्हा शिव आपल्या पूर्ण परिवारासह तेथे आले आणि त्याला अस्त्र-शस्त्र यांची विद्या प्रदान केली. तसेच त्या वेळी शिवाने परशुरामाला अमरत्वाचे वरदानही दिले. येथेच शिवाने परशुरामाला दिव्यास्त्रही दिले. इथे परशुरामाने कर्णाला धनुर्विद्या दिली. परशुरामाच्या समोर स्वयंभू शिवलिंग उत्पन्न झाले आहे. शिवपिंडीच्या बरोबर वर गुहेच्या छतामध्ये गायीच्या आचळांसारखी आकृती आहे. तेथून शिवलिंगावर सतत पाणी ठिपकत असते. ‘कामधेनू सतत त्या लिंगावर अभिषेक करत असते’, असे म्हणतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या आचळांतून शिवपिंडीवर दुधाचा अभिषेक होतो. परशुरामाच्या शिळेच्या वर गोमुखासारख्या आकृत्याही निर्माण झाल्या आहेत. त्यातूनही थेंब थेंब पाणी पडत असते. त्रेतायुगात भगवान परशुरामाने या ठिकाणी दिव्य स्वयंभू शिवलिंग स्थापन केले होते. त्या वेळी प्रसन्न होऊन भगवान शंकराने सहपरिवार परशुरामाला विशेष वरदान दिले होते. त्यामुळे धनुर्विद्या, पाशुपतास्त्र, दिव्यास्त्र आणि शिवाचे अजय धनुष्य परशुरामाला प्राप्त झाले होते. त्याला विशेष आशीर्वाद आणि त्याचसमवेत दिव्य शक्ती मिळाली होती.

– श्री. गौरव सेठी, पंचकुला, हरियाणा. (२४.४.२०१७)

‘पितरांच्या आदेशानुसार परशुरामाने अश्वमेध महायाग केला. यज्ञ-पुरोहित कश्यप ऋषींना संपूर्ण पृथ्वी समर्पित केली व तो स्वतः दक्षिण सागरतीरावर गेला. परशुरामाने समुद्रकिनार्‍यावरच्या सह्याद्री पर्वतावरून आपला परशु वेगाने समुद्रात फेकला आणि भडोचपासून कन्याकुमारीपर्यंतचा सगळा सागरीप्रदेश सागराकडून भेट घेतला. परशुरामाने संपूर्ण पृथ्वीचे दान कश्यपाला दिल्याने त्याने सागराकडून हा नवा समुद्रगत प्रदेश घेतला. ती परशुरामभूमी होय.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मे २००५)

परशुरामाचे त्रिपुर क्षेत्र

‘त्रिपुर’ हे केरळातले सर्वाधिक प्राचीन क्षेत्र आहे. भगवान परशुरामाने केरळमध्ये त्रिपुर येथे सागरकिनारी अति भव्य मंदिर बांधले आणि लोकांना तिथेच त्याचे अखेरचे दर्शन झाले. आद्यशंकराचार्यांच्या माता-पित्यांनी अपत्य प्राप्तीकरता इथेच अनुष्ठान केले.

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित ऑक्टोबर २०१०)

सदैव परशु धारण करणारा परशुराम !

सुश्री (कु.) मधुरा भोसले

भृगुसंहितेचे जनक महर्षि भार्गव यांच्या कुळात (परशु)रामाचा जन्म झाला; म्हणून त्याला ‘भार्गवराम’ असे म्हणतात. भार्गवरामाचे जन्मनाव ‘राम’ होते. त्याने शिवाची कठोर आराधना करून शिवाला प्रसन्न करून घेतले आणि शिवाने त्याला पिनाक धनुष्य अन् तेजस्वी परशु ही शस्त्रे बहाल केली. राम पिनाक धनुष्य आवश्यकतेनुसार धारण करत असे; परंतु त्याच्याजवळ सदैव परशु असे. त्यामुळे त्याला सर्व जण परशु धारण करणारा राम, म्हणजे ‘परशुराम’ या नावाने संबोधू लागले.

परशुरामाची वैशिष्ट्ये

सप्त चिरंजीवांपैकी एक असणे : बळीराजा, भगवान परशुराम, मारुतिराया, बिभीषण, महर्षि व्यास, कृपाचार्य आणि अश्वत्थामा हे सप्तचिरंजीव आहेत. परशुरामाने काळावर विजय प्राप्त केलेला आहे. त्यामुळे तो सप्त चिरंजीवांपैकी एक आहे.

अखंड ब्रह्मचारी असणे : परशुरामाने कामवासनेला जिंकले असल्याने तो अखंड ब्रह्मचारी आहे.

हैैहय वंशातील राजा कार्तवीर्य सहस्रार्जुनाने जमदग्नि ऋषींच्या आश्रमातून कामधेनूचे अपहरण करणे आणि गोमातेच्या रक्षणास्तव परशुरामाने अवतारी कार्याला आरंभ करणे : त्रेतायुगाच्या पूर्वार्धात हैहय वंशातील क्षत्रिय महिष्मती नरेश कार्तवीर्य सहस्रार्जुनाने राजसत्तेने उन्मत्त होऊन प्रथम जमदग्नि ऋषींच्या आश्रमातील कामधेनूचे अपहरण केले. परशुरामाने गोमातेचे रक्षण करण्यासाठी सहस्रार्जुनाशी युद्ध केले आणि त्याला पराभूत करून कामधेनूला पुन्हा जमदग्नि आश्रमात आणले. या प्रसंगानंतर अहंकारी क्षत्रियांनी सूड उगवण्यासाठी परशुरामाच्या कुटुंबियांवर आक्रमण केले आणि क्षत्रिय अन् परशुराम यांच्यामध्ये संघर्ष चालू झाला. अशा प्रकारे कामधेनूला मुक्त करण्यासाठी परशुरामाने शिवाने दिलेल्या परशूने सहस्रार्जुनाशी युद्ध करून अवतारी कार्याचा शुभारंभ केला.

काळानुसार समष्टी साधना करणे : जमदग्निपुत्र परशुराम इतर ऋषीपुत्रांप्रमाणे संपत्काळात आश्रमात राहून व्यष्टी साधनेअंतर्गत नित्य नैमित्तिक यज्ञयाग, वेदाध्ययन आणि जप-अनुष्ठान, तसेच ध्यान-धारणा करत होता; मात्र जेव्हा सहस्रार्जुनाप्रमाणे अनेक क्षत्रिय उन्मत्त होऊन प्रजेवर अत्याचार करू लागले, तेव्हा आपत्काळाची भीषणता ओळखून परशुरामाने त्वरित व्यष्टी साधनेला विराम दिला आणि प्रजा, तसेच गुरुकुल यांच्या रक्षणासाठी समष्टी साधनेच्या अंतर्गत दुर्जन क्षत्रियांशी युद्ध आरंभले.

वर्णानुसार क्षात्रधर्म साधना करणे : महर्षि जमदग्नीचा वर्ण ब्राह्मण आणि श्री रेणुकामातेचा वर्ण क्षत्रिय होता. परशुराम जन्माने ब्राह्मण; परंतु गुण अन् कर्म यांनी क्षत्रिय होता. त्यामुळे त्याने क्षत्रिय वर्णानुसार आचरण करत क्षात्रधर्माचे पालन करून दुर्जनांचा नाश केला.

भगवान परशुराम हे काळानुसार समष्टी साधनेचे आणि वर्णानुसार क्षात्रधर्म साधनेचे उत्तम उदाहरण आहे.

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांद्वारे अधर्माचे उच्चाटन करणे : पित्याप्रमाणे ब्राह्मतेज आणि मातेप्रमाणे क्षात्रतेज असणारा परशुराम हा योद्धावतार आहे. दोन्ही तेजांनी संपन्न असणार्‍या परशुरामाने ब्रह्मवृंदाला नामशेष करण्यासाठी आलेल्या, त्यांचे आश्रम आणि गुरुकुल यांची उज्ज्वल परंपरा उद्ध्वस्त करणार्‍या अन्यायी राजसत्तेला ललकारले. वैदिक ज्ञानाचे ब्राह्मतेज आणि शस्त्ररूपी क्षात्रतेज यांद्वारे परशुरामाने अधर्माचे उच्चाटन केले. दुष्टांना शाप देऊन किंवा त्यांच्यावर शस्त्राने वार करून कठोर शासन केले.

कर्तव्याचे कठोरपणे पालन करूनही प्रेमळ आणि क्षमाशील असणारा परशुराम ! : क्षात्रतेजसंपन्न भगवान परशुरामाने २१ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून दुर्जन क्षत्रियांचा नाश केला आणि राजा जनकासारख्या धर्मशील राजांना कृपाशीर्वादासह अभयदानही दिले. मातेला कलंकमुक्त करण्यासाठी परशुरामाने पिता जमदग्नि यांच्या आज्ञेवरून माता आणि बंधू यांचा शिरच्छेद केला. जेव्हा पित्याने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले, तेव्हा परशुरामाने माता आणि बंधू यांना पुनर्जिवीत करण्याचा वर मागितला. या प्रसंगावरून ‘कर्तव्याचे कठोरपणे पालन करणारा परशुराम प्रेमळ आणि क्षमाशीलही होता’, हे दिसून येते.

अत्यंत कठीण असणार्‍या निवृत्तीमार्गाचे अनुसरण करून ब्रह्मचर्याश्रमातून थेट संन्यासाश्रमात प्रवेश करणे : भगवान परशुराम हा मानव रूपातील विष्णूचा अवतार होता. त्याचे अंतःकरण उत्कट वैराग्याने ओतप्रोत भरले होते. त्यामुळेच त्याने अत्यंत कठीण असणार्‍या निवृत्तीमार्गाचे अनुसरण करून ब्रह्मचर्याश्रमातून थेट संन्यासाश्रमात प्रवेश केला.

परिपूर्ण वैराग्याचे प्रतीक : आजीवन निष्काम कर्म केल्यावर शिवाच्या आज्ञेने क्षत्रियांचे उच्चाटन थांबवले. क्षत्रिय वधाच्या पापक्षालनासाठी परशुरामाने अश्वमेध यज्ञ केला आणि या यज्ञाचे अध्वर्यू महर्षि कश्यप यांना जिंकलेली संपूर्ण पृथ्वी दान केली. परशुरामाने कर्तव्यपूर्तीनंतर क्षत्रिय कर्माचा त्याग करून कर्मसंन्यास धारण केला. अशा प्रकारे भगवान परशुराम परिपूर्ण वैराग्याचे प्रतीक आहे.

दुर्जनांचा विनाश करण्यासमवेत धर्माधिष्ठित सृष्टीची निर्मिती आणि संगोपन करणे : कश्यप ऋषींना दान केलेल्या संपूर्ण पृथ्वीवर परशुरामाला रहाता येणार नव्हते; म्हणून पुण्यबळाच्या साहाय्याने ते तत्क्षण महेंद्र पर्वतावर गेले आणि त्यांनी अरबी सागरावर बाण सोडून त्याला मागे सारले. केवळ तीन पावले टाकून त्यांनी वैतरणा नदी ते कन्याकुमारीपर्यंत परशुराम भूमी निर्माण केली. पूर्वेकडे सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिमेकडे अरबी सागर यांच्या मधोमध असणारा भूमीचा पट्टा म्हणजेच परशुराम भूमी किंवा परशुरामाचे क्षेत्र.

स्वतःचे अवतारी कार्य प्रत्यक्ष पूर्ण करणे आणि रामकृष्णादी अवतारांच्या कार्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होणे : परशुरामाने दुर्जनांचा नाश करून प्रत्यक्षरित्या अवतारी कार्याची पूर्तता केली. त्रेतायुगात प्रभु श्रीरामाचा अवतार झाल्यावर परशुरामाने स्वतःमधील क्षात्रतेज आणि अवतारी सामर्थ्य प्रभु श्रीरामात संक्रमित केले. अशा प्रकारे धर्मयुद्धात रावणावर विजय मिळण्यासाठी परशुरामाने श्रीरामाला अप्रत्यक्षपणे साहाय्य केले. द्वापरयुगात महाभारताच्या युद्धात परशुराम शिष्य भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि कर्ण हे अधर्माच्या बाजूने लढत होते. त्यामुळे परशुरामाने या तिघांनाही साहाय्य केले नाही. उलट कर्ण अर्जुनाशी अटीतटीचे युद्ध लढत असतांना परशुरामाने पूर्वीच दिलेल्या शापामुळे ऐनवेळी कर्णाचे बळ क्षीण झाले. त्यामुळे अर्जुन कर्णाचा वध करू शकला. योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आणि हनुमान यांच्याप्रमाणेच भगवान परशुरामाचेही पांडवांच्या विजयात मोलाचे योगदान आहे.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

लोटे-परशुराम येथील परशुरामाचे पुरातन मंदिर

लोटे-परशुराम येथील परशुरामाचे पुरातन मंदिर

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणजवळील लोटे गावातील महेंद्र पर्वतावर भगवान परशुरामाचे पुरातन मंदिर आहे. तेथे परशुरामाचे पदचिन्ह उमटलेल्या शिळेचे नित्यपूजन होते. या शिळेच्या मागे तीन मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. मध्यभागी भगवान परशुरामाची आकाराने मोठी आणि रेखीव मूर्ती आहे. तिच्या उजवीकडे काळदेवतेची आणि डावीकडे कामदेवतेची लहान आकाराची मूर्ती आहे. भार्गवरामाने काळ आणि काम यांवर विजय प्राप्त केल्याचे त्या द्योतक आहेत.

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.४.२०१५)