गेल्या निवडणुकीत मतदान केले; मात्र या निवडणुकीत मतदारसूचीत नाव नाही !

प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविषयी अनेकांची अप्रसन्नता

कुडाळ – निवडणूक आयोगाकडून एकीकडे मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. यासाठी कोट्यवधी रुपये खर्चही केला जात आहेत. असे असले, तरी गेल्या वेळच्या निवडणुकीत  मतदान केलेल्या अनेकांची नावे या निवडणुकीच्या वेळी  मतदारसूचीत नसल्याचे निदर्शनास आले. यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित रहाण्याची शक्यता निर्माण झाले आहे.

सद्य:स्थितीत लोकसभा निवडणुकीच्या ‘वोटर्स स्लिप’चे वितरण करण्याचे काम ग्रामपातळीवर चालू आहे. या वेळी दीड वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत जी नावे मतदारसूचीत होती, त्यातील काही नावे या निवडणुकीच्या वेळी सूचीतून वगळली गेल्याचे उघड झाले. अनेक मतदारांच्या घरापर्यंत या ‘वोटर्स स्लिप’ पोचल्या नसल्याने मतदारांनी मतदारसूची तपासली असता त्यांचे नाव सूचीत नसल्याचे निष्पन्न झाले आहे. कुडाळ तालुक्यात काही माजी सैनिकांसह अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनाही या समस्येला सामोरे जावे लागत आहे. दोडामार्ग पंचायत समितीच्या माजी सभापती विशाखा विलास देसाई यांचेच नाव मतदारसूचीतून वगळण्यात आल्याने त्यांनीही आश्चर्य व्यक्त करत प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात अप्रसन्नता व्यक्त केली आहे.

गेला महिना निवडणूक प्रशासनाने मतदारांमध्ये जागृती होऊन मतदानाचे प्रमाण वाढावे,यासाठी विशेष अभियान राबवले. यामध्ये अनेक स्पर्धा, एकांकिका, दशावतारी नाटके, फेर्‍या, पथनाट्ये आदींच्या माध्यमांतून प्रयत्न केले; मात्र मतदारसूचीत नावे नसल्यास त्याचा परिणाम मतदानाच्या प्रमाणावर होणार आहे.

मतदार सतर्क राहिल्यास  समस्या टळेल ! – तहसीलदार, कुडाळ

कुडाळ तालुक्यात घडलेल्या या प्रकाराविषयी तहसीलदार विरसिंग वसावे म्हणाले, ‘‘निवडणुकीच्या कालावधीत ग्रामपंचायत स्तरावर मतदारसूची प्रसिद्ध केली जाते. ही सूची प्रसिद्ध झाल्यावर ती तपासून त्यात काही आक्षेप अथवा पालट असल्यास संबंधित अधिकार्‍याकडे त्याची ठराविक कालावधीत नोंद करणे आवश्यक आहे. या नोंदीनंतर अंतिम मतदारसूची प्रसिद्ध केली जाते. प्राथमिक सूचीत नाव नसल्याचे लक्षात आल्यावर मतदाराने आक्षेप नोंदवल्यास सूची अंतिम करतांना मतदाराचे नाव समाविष्ट करून मतदानाचा हक्क बजावता येतो. त्यामुळे मतदार त्यांच्या मतदारसूचीतील नावासाठी सतर्क राहिल्यास पुढे निर्माण होणारी समस्या टाळता येऊ शकते.’’