धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !

४ मे २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘भगवंताने सनातन संस्थेची स्थापना करणे, विश्वाचे घटक असलेली व्यक्ती आणि कुटुंब’ यांविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहू.

मागील भाग पहा – https://sanatanprabhat.org/marathi/790398.html

‘सनातन संस्था’

५. विश्वाचा तिसरा घटक – समाज

५ अ. आजची संपूर्ण विश्वातील समाजव्यवस्था कोलमडून पडली असल्याने ‘अखंड भोगवादाच्या दुनियेत डुंबत रहाणे’, हेच लोकांनी अंगीकारले असल्याने समाजव्यवस्था विचित्र अवस्थेत असणे :

सौ. अंजली जोशी

आजची संपूर्ण विश्वातील समाजव्यवस्था कोलमडून पडली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये केवळ भोगवाद सांगितल्याने तेथे घरामध्ये वडीलधार्‍यांना स्थान नाही. अखंड भोगवादाच्या दुनियेत डुंबत रहाणे हेच तेथील लोकांनी अंगीकारल्याने तेथील समाजव्यवस्था विचित्र अवस्थेत आहे. भयग्रस्तता, निराशा, खालावलेली मानसिकता, असुरक्षितता इत्यादींमुळे निर्माण झालेली हिंसाचारी वृत्ती, अशी पिढी निर्माण झाल्याने तेथील समाजव्यवस्था अत्यंत मोडकळीस आली आहे.

५ आ. पुरो(अधो)गाम्यांनी धर्मविघातक कृती करण्यात धन्यता मानणे, केवळ भारतभूमीतच धर्म आणि अध्यात्म अत्यंत प्रभावी असून ही योगभूमी असल्याने सध्या तरी भारताची स्थिती चांगली असणे : वैश्विक जीवनही भयग्रस्त आहे. भारतावर शासन करणार्‍या मोगल आणि ब्रिटीश यांनी येथे अत्याचार करून, बळजोरीने अथवा मृत्यूचा धाक दाखवून हिंदु धर्मियांना स्वधर्मापासून दूर नेले होते. त्याचा परिणाम आजही दिसत आहे. पुरो(अधो)गाम्यांनी धर्मविघातक कृती करण्यात धन्यता मानली आहे. केवळ भारतभूमीतच धर्म आणि अध्यात्म अत्यंत प्रभावी असल्याने ही योगभूमी आहे. सध्या तरी भारताची स्थिती चांगली आहे. अध्यात्म अन् हिंदु धर्माचे ज्ञान देण्याचे दायित्व भारतातील अनेक संत, आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था यांच्यावर आहे.

५ इ. सनातन संस्था करत असलेले कार्य : धार्मिक संस्थेतीलच एक ‘सनातन संस्था’ आहे. संस्थेने समाजाला सोप्या भाषेत अध्यात्म शिकवणारे ग्रंथ निर्माण केले आहेत. तसेच सध्याच्या पिढीला विज्ञानाच्या भाषेत अध्यात्म शिकवणारे ग्रंथ, ध्वनीचित्र चकती, दैनिक ‘सनातन प्रभात’, सनातन पंचांग, बालसंस्कारवर्ग, प्रवचने, सत्संग, तसेच कार्यालये, अधिकोष, आस्थापने इत्यादी ठिकाणी तणावमुक्तीसाठी मार्गदर्शन अशा अनेक माध्यमांतून पुन्हा उत्तम समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी साहाय्य होत आहे.

६. विश्वाचा महत्त्वाचा घटक – राष्ट्र

६ अ. धर्माला ग्लानी येऊन उतरती कळा लागणे आणि तेव्हा त्या राष्ट्रावर अनेक प्रकारची संकटे येऊन समाज विखुरला जाणे अन् संघटितपणे धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न न झाल्याने भगवंताला अवतार घ्यावा लागणे : राष्ट्र हे अनेक नीतीमूल्यांवर आधारित समाजव्यवस्था असलेले हवे, तरच ते सुदृढ असते. जेथे धर्माचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात आणि धर्माप्रती प्रेम, आस्था अन् दृढ श्रद्धा असेल, तेथे व्यक्ती अन् समाज यांना साधना करणे सोपे जाते. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येऊन उतरती कळा येऊ लागते, तेव्हा त्या राष्ट्रावर अनेक प्रकारची संकटे येतात. अधर्मी प्रबळ होतात आणि समाज विखुरला जातो. अधर्मी संघटित होतात आणि धर्माची बाजू पांगळी होते. संघटितपणे धर्म टिकवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे प्रत्यक्ष भगवंताला अवतार घ्यावा लागतो.

६ आ. संपूर्ण विश्वात अध्यात्म आणि धर्मज्ञान देण्याचे दायित्व भारतातील अनेक संत, आध्यात्मिक संस्था आणि धार्मिक संस्था पार पाडत असणे : आजच्या संपूर्ण विश्वाची अशाच प्रकारची स्थिती दिसत आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वाची खालावलेली स्थिती उत्तम करण्याचे दायित्व आपोआपच भारतावर येते. संपूर्ण विश्वात अध्यात्म आणि धर्मज्ञान देण्याचे दायित्व भारतातील अनेक संत, आध्यात्मिक आणि धार्मिक संस्था यांच्यावर आहे; कारण विश्वाचा आध्यात्मिक गुरु भारत देश आहे. त्यातीलच एक धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली ‘सनातन संस्था’ जगात अनेक ठिकाणी आधार देत आहे.
(समाप्त)

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (१३.३.२०२४)