धर्मसंस्थापनेचे कार्य हाती घेऊन गेली २५ वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेली सनातन संस्था !

सनातन संस्था

१. सर्व सृष्टी संपूर्ण आणि विश्व आनंदी होण्यासाठी भगवंताने सनातन संस्थेची स्थापना करणे

सौ. अंजली जोशी

‘भगवंताने विश्व निर्माण करतांना ते काही घटकांमध्ये विभागले आहे. हे अविभाज्य घटक पुढीलप्रमाणे आहेत – त्यातील प्रथम घटक म्हणजे मनुष्य (व्यक्ती), अनेक व्यक्तींचे मिळून कुटुंब आणि अनेक कुटुंबे मिळून समाज बनतो. वेगवेगळे समाज मिळून राष्ट्र आणि अनेक राष्ट्रे मिळून विश्व बनले आहे. या विश्वाच्या कल्याणार्थ भगवंताने सनातन संस्था निर्माण केली आहे.

प्रत्येक युगात धर्मलय होतो आणि धर्माच्या उत्थापनासाठी भगवंत अवतार धारण करतो. असेच ईश्वराचे अवतरण ‘सनातन संस्थे’च्या माध्यमातून झाले आहे. आतासुद्धा धर्माचे नियम पाळले जात नाहीत. त्यामुळे संपूर्ण विश्व दुःखाच्या खाईत लोटले गेले आहे. पुन्हा सर्व सृष्टी आणि विश्व आनंदी होण्यासाठी भगवंताने ‘सनातन संस्थे’ची स्थापना केली आहे.

२. विश्वाचा पहिला घटक – व्यक्ती

२ अ. व्यावहारिक सुख मिळवण्यासाठी मानवजातीने धर्माचरण आणि साधना त्यागणे : आज प्रत्येक व्यक्ती शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि आर्थिक अशा समस्यांमुळे तणावाखाली जगत आहे. त्यामुळे व्यक्तीला जीवनात आनंद मिळत नाही; कारण आनंद मिळवण्यासाठी जे उत्तम साधन आहे, तेच मानवजातीने त्यागले आहे आणि ते म्हणजे, ‘धर्माचरण आणि साधना.’ ‘सनातन संस्थे’ने प्रत्येक व्यक्तीला जीवनात सतत आनंदी रहाण्यासाठी साधना सांगितली आहे.

३. प्रत्येकाची साधना होण्यासाठी आणि त्यातून मानवी जीवनाचे ध्येय मोक्षप्राप्ती हे साध्य करण्यासाठी साधनेचे विविध टप्पे सांगणारा गुरुकृपायोग निर्मिला आहे !

३ अ. नामस्मरण : भगवंताच्या नामातून चैतन्य आणि आनंद मिळतो; कारण तो सच्चिदानंद आहे. अखंड आनंदावस्थेत असल्यामुळे तो त्याच्या नामाच्या चैतन्यातून प्रत्येक व्यक्तीला आनंद प्राप्त करून देत असतो.

३ आ. सत्संग : सतत सत्संगात राहिल्याने व्यक्ती सत्त्वगुणी बनते. संतांच्या वाणीतून सांगितलेले ईश्वरी गुण आत्मसात् करण्याची संधी मिळते. त्यामुळे मनुष्यातील अवगुण जाऊन साधना करत मनुष्य सात्त्विकतेकडे वाटचाल करतो आणि हळूहळू भगवंताशी एकरूप होऊ लागतो.

३ इ. सत्सेवा : सत्सेवेतून कर्मयोग साध्य होतो; कारण ती व्यक्ती फळाची अपेक्षा न करता भगवत्सेवा करते.

३ ई. त्याग : जे जे आपल्याला भगवंताने दिले आहे, तेच त्याला अर्पण करणे; म्हणजेच साधना आणि धर्मकर्तव्य करतांना तन, मन, धन आणि बुद्धी यांचा त्याग होतो. हिंदु धर्माची महानता त्यागात आहे. त्याग केल्याने मनुष्याचे प्रारब्ध हळूहळू नष्ट होते.

३ उ. प्रीती : व्यष्टी आणि समष्टी साधना केल्याने व्यक्तीमध्ये व्यापकता येते. तसेच समष्टीशी संपर्कात आल्याने आपोआपच तो सर्वांवर प्रीती करू लागतो, जसा परमेश्वर संपूर्ण विश्वावर प्रीती करतो; म्हणूनच हिंदु धर्माचे ‘वसुधैव कुटुम्बकम् ।’ म्हणजे ‘संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे’, हे सुंदर ब्रीद आहे.

३ ऊ. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन : जीवनातील आनंद गमावून बसलेल्या व्यक्तीने तो पुन्हा प्राप्त करण्यासाठी स्वभावदोष आणि अहं निर्मूलन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सनातन संस्थेने अनेक ग्रंथ लिहिले आहेत अन् त्यासाठी ‘नेमकेपणाने काय कृती करायला हवी’, हेही शिकवले आहे. त्यामुळे व्यक्ती जीवनात आनंद प्राप्त करू लागते. या दोन अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यांतून गेल्यावर पुढचा क्षात्रधर्म साधनेचा टप्पा व्यक्तीला सहज गाठता येतो; कारण साधना केल्याने तो भयमुक्त होतो.’

४. विश्वाचा दुसरा घटक – कुटुंब

४ अ. सनातनने वैश्विक कुटुंबव्यवस्था निर्माण केल्याने संसारात सुसंवाद साधला जाऊन प्रत्येकाला आनंदाने रहाता येणे : अनेक व्यक्तींचे मिळून कुटुंब बनलेले असते. या कुटुंबात सौख्य, आनंद आणि शांती हे समाविष्ट होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीत इतरांना समजून घेणे, इतरांच्या विचारांचा आदर करणे, योग्य आणि अयोग्य काय हे समजून कृती करणे, सर्वांवर प्रीती करणे हा भाग येतो. हा सर्व भाग प्रत्येकाने साधना केली, तरच शक्य आहे. हे सनातन संस्थेने सांगितल्याप्रमाणे साधना करून अनेक कुटुंबांनी अनुभवलेही आहे. ‘ज्या घरात पूर्वी पती-पत्नीचे किंवा सासू-सुना यांचे पटत नव्हते, मुलांचे आई-वडिलांशी पटत नव्हते’, अशा ठिकाणी आता ‘संसारात सुसंवाद साधला जाऊन प्रत्येक जण आनंदाने रहातो’, असे दृश्य दिसायला लागले आहे. पाश्चात्त्यांनी विभक्त कुटुंब पद्धत अंगीकारल्याने कौटुंबिक स्वास्थ्य मोडकळीस आले होते. सनातनने वैश्विक कुटुंबव्यवस्था निर्माण केल्याने आता ते स्वास्थ्य पुन्हा मिळायला लागले आहे. विदेशातील लोकही याचा अनुभव घेत आनंदी झाले आहेत.
(क्रमशः)

– सौ. अंजली अजय जोशी (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, मिरज. (१३.३.२०२४)