पुरामागील कारण ‘हवामान पालट’ ! – राष्ट्रपती
ब्राझिलिया (ब्राझिल) – ब्राझिलच्या दक्षिण भागांत मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलन यांमुळे परिस्थिती बिकट झाली आहे. आतापर्यंत तेथे ५८ लोकांचा मृत्यू झाला असून ७४ हून अधिक जण घायाळ झाले आहेत. पुरामुळे ७० सहस्रांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले आहे. यासह ६७ लोक बेपत्ता आहेत. ब्राझिलच्या पोर्टो अलेग्रे शहराला पुराचा मोठा फटका बसला आहे.
ब्राझिलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली असून केंद्र सरकारकडून साहाय्याचे आश्वासन दिले आहे. या परिस्थितीला त्यांनी हवामान पालटाला उत्तरदायी धरले आहे. रिओ ग्रांदे डो सुल राज्यात पावसामुळे धरण कोसळण्याचा धोका आहे. गुआबा नदीचा स्तर वर्ष १९४१ नंतर सर्वाधिक झाला असून तो ५.०४ मीटर इतक्या उंचीवर आहे. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.