सिंधुदुर्ग : प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त सावंतवाडी येथे विष्णुयाग

प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्ताने . . . 

प.पू. भाऊ मसुरकर

सावंतवाडी : येथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यास ३० एप्रिल या दिवशी प्रारंभ झाला. या दिवशी येथील श्री विठ्ठल मंदिरात सकाळी काकड आरती, त्यानंतर मडगाव, गोवा येथील श्री. सत्येंद्र बखलेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णुयाग करण्यात आला. यागाचे यजमानपद श्री. अविनाश सुभेदार (निवृत्त सचिव, महाराष्ट्र राज्य) आणि त्यांच्या पत्नी सौ. रोहिणी सुभेदार यांनी भूषवले.

श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील आकर्षक मूर्ती !

संध्याकाळी कोल्हापूर येथील अलंकारनिर्मित ‘रसिक रंजन’च्या वतीने अभंग, भक्तीगीते, भावगीते यांचा समावेश असलेला ‘भजनसंध्या’ हा कार्यक्रम झाला. सावंतवाडी येथील श्री. संजय ठाकूर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दायित्वाने सेवा केली. या वेळी प.पू. भाऊ मसुरकर यांचे भक्त (अनुयायी) मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्ञानोत्तर कार्याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील प.पू. भाऊ मसुरकर !

प.पू. भाऊ मसुरकर

१. गणकयंत्रापेक्षाही अल्प वेळेत मोठमोठ्या संख्यांची बेरीज, गुणाकार आणि भागाकार करणे

सनातनचे कार्य सर्वप्रथम मुंबई आणि गोवा येथे अन् त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे चालू झाले. त्या वेळी अभ्यासवर्ग घेण्यासाठी प.पू. भाऊंनी शहरातील स्टेट बँकेच्या शाखेच्या वर असलेले त्यांचे सभागृह आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिले आणि त्यांच्या लॉजवर आमच्या रहाण्याची सोयही विनामूल्य केली. तेथे आम्हाला त्यांच्याकडून संख्याशास्त्र शिकायला मिळाले. प.पू. भाऊ जेव्हा संख्याशास्त्र शिकवायचे, तेव्हा मी अगदी स्तिमित होऊन जायचो. गणकयंत्रापेक्षाही अल्प वेळेत भाऊ मोठमोठ्या संख्यांची बेरीज, गुणाकार, भागाकार इत्यादी बोलता बोलता कधी करत ते कळतही नसे; कारण एखादे गणित करण्यासाठी भाऊ क्षणभर थांबले, असे कधीही जाणवले नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२. सर्वसामान्यांवर मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणे

प.पू. भाऊंना त्यांचे ‘भाऊ’ हे नाव किती सार्थ ठरते, हे त्यांच्या सहवासात आल्यावर आमच्या अनुभवास आले. गुरुपदाचे अधिकारी असलेल्या प.पू. भाऊंनी कधीच कुणालाही शिष्य या नात्याने वागवले नाही; उलट सर्वांना ते भावाच्या नात्याने वागवत असत. मलाही त्यांनी मोठ्या भावाचे प्रेम दिले. साधना, ज्ञान, आध्यात्मिक पातळी इत्यादी सर्वच गोष्टींत त्यांच्यापेक्षा कनिष्ठ असलेल्या कुणामध्येही प.पू. भाऊंनी न्यूनगंडाची भावना कधीच निर्माण होऊ दिली नाही. सर्वांना त्यांनी प्रेमाने मिठी मारून सख्यभक्तीची ओळख करून दिली.

३. प.पू. भाऊंचे तेजस्वी व्यक्तीमत्त्व, हे त्यांच्या आध्यात्मिक शक्तीचे लक्षण !

‘काही दिवस न जेवता, न झोपता उत्साहाने सतत बोलत रहाणे शक्य आहे’, असे जर कुणी सांगितले असते, तर आम्ही डॉक्टर असल्याने ते खरे मानले नसते; मात्र प.पू. भाऊंसमवेत रहातांना याचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यावर आमची खात्री पटली. अशी क्षमता, तसेच त्यांचे धारदार बोलणे आणि तेजस्वी डोळे ही सर्व त्यांच्यात असलेल्या आध्यात्मिक शक्तीची लक्षणे होती.

४. ‘संसारात राहून साधना’ या तत्त्वाचे प.पू. भाऊ हे मूर्तीमंत प्रतीक !

‘ज्ञानोत्तर कार्य म्हणजे काय ?’, याचे भाऊ हे मूर्तीमंत उदाहरण होते. कर्मफळाची अपेक्षा न करता भाऊ कार्य करत राहिले. ‘संसारात राहून साधना’ या तत्त्वाचे भाऊ हे मूर्तीमंत प्रतीक होते. संसारातील सर्व कर्तव्यकर्मे आणि दायित्व त्यांनी पूर्णपणे पार पाडले; मात्र त्याच वेळी ते सर्वांपासून अलिप्त होते. भाऊंच्या ज्ञानाबद्दल तर सांगायलाच नको. अध्यात्मातील कोणत्याही विषयावर पूर्वसिद्धतेविना ते घंटोन्‌घंटे प्रवचन करायचे. भाऊंची विठ्ठलभक्तीही अनुपमेय अशीच होती.

५. ‘संख्याशास्त्रानुसार साधना’ हा ग्रंथ प.पू. भाऊंनीच लिहून घेणे

प.पू. भाऊ मसुरकर यांनी वेळोवेळी सांगितलेल्या माहितीवर आधारित सनातन संस्थेने ‘संख्याशास्त्रानुसार साधना’ हा ग्रंथ १ मे २००० या दिवशी म्हणजे प.पू. भाऊ मसुरकर यांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी प्रकाशित केला होता. भाऊंनी सांगितलेली माहितीच या ग्रंथात संकलित केली आहे, म्हणजे वास्तविक पहाता हा ग्रंथ प.पू. भाऊंनीच लिहिला, असे म्हणता येईल. जिज्ञासूंना संख्याशास्त्राची तोंडओळख तरी व्हावी, म्हणून आम्ही प.पू. भाऊंनी सांगितलेली माहिती या ग्रंथात संकलित केली.

६. प.पू. भाऊंच्या कृपेमुळेच श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना ईश्वरी तत्त्वाची प्रचीती येणे

३० एप्रिल आणि १ मे २०२४ असे २ दिवस प.पू. भाऊंच्या जन्मशताब्दिनिमित्त श्री विठ्ठल मंदिरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या वतीने शुभेच्छा ! श्री विठ्ठल मंदिर आज एक जागृत देवस्थान झाले आहे. याचे महत्त्वाचे एक कारण म्हणजे भाऊंची भक्ती आणि त्यांनी सहस्रो साधकांकडून तेथे करून घेतलेली साधना होय. या मंदिरात श्री विठ्ठलाची विविध नावांनी उपासना केल्यामुळे संख्याशास्त्रानुसार १ ते ९ अशा सर्व अंकांची स्पंदने तेथे आहेत; म्हणूनच सहस्रो भाविकांना तेथे ईश्वरी तत्त्वाची प्रचीती आली आहे आणि येत आहे.

प.पू. भाऊ हे आपल्यात देहरूपाने नाहीत; मात्र तत्त्व रूपाने ते आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. त्यांच्याप्रती सातत्याने कृतज्ञ राहून साधनारत राहूया !

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले (२६.४.२०२४)

विष्णुयागाची पूर्णाहुतीने सांगता करतांना सौ. रोहिणी सुभेदार, श्री. अविनाश सुभेदार, पुरोहित आणि अन्य मान्यवर

१ मे या दिवशी सकाळी ६ वाजता सौ. रोहिणी सुभेदार आणि श्री. अविनाश सुभेदार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात महापूजा, संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन, श्री विठ्ठल मंदिराच्या कार्यात योगदान देणार्‍यांचा सत्कार, असे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प.पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी समितीने केले आहे.


हे ही वाचा – सिंधुदुर्ग : सावंतवाडीत प.पू. भाऊ मसुरकर यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याची सांगता