|
पुणे – १० वर्षांआधी भारतावर आतंकवादी आक्रमणे व्हायची, मुंबईत आतंकवादी आक्रमणे होत होती, काशीमध्ये बाँबस्फोट व्हायचे, अयोध्येमध्ये बाँबस्फोट व्हायचे, आता हे सर्व बंद झाले की नाही ? जे इथे शेजारून (पाकिस्तान) स्फोट करायची सवय झाली होती, जे शेजारचे आपल्या देशात आतंकवादी पाठवायचे, त्यांना आता अन्न मिळणे कठीण झाले आहे. पी.एफ्.आय.वर प्रतिबंध लावला, काँग्रेसच्या कार्यकाळात आतंकवादाला चालना मिळाली. मुंबई आणि पुणे येथे रक्तस्त्राव झाला होता; पण हा मोदी, घरात घुसून मारणार, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले आहे. पुणे येथील रेसकोर्स मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या प्रचारार्थ सभेत हे वक्तव्य केले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. देशात कधीच धर्माच्या आधारावर आरक्षण लागू होऊ शकत नाही. धर्माच्या आधारे आरक्षण देऊन देशाचे विभाजन करण्याचे काम भारत आघाडी करत आहे; पण मोदी अजूनही जिवंत आहेत. मोदी हे होऊ देणार नाहीत.
२. मला फक्त १० वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. समाजातील सर्व घटकांच्या आकांक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. या वेळी बजेटमधे १ लाख कोटी रुपये ‘इनोव्हेशन’साठी दिले. पुण्याला याचा लाभ होईल. आधीच्या सरकारांनी भ्रष्टाचाराचा टॅक्स वसूल केला, असे म्हणत मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले.
३. मनमोहन सिंह यांच्या सरकारने १० वर्षांत मुलभूत विकासावर जेवढा खर्च केला, तेवढा आम्ही एका वर्षात केला. ‘स्टार्टअप इंडिया’ची कमाल म्हणजे केवळ १० वर्षांत सव्वा लाखाहून अधिक ‘स्टार्टअप’ सिद्ध झाले आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील अनेक ‘स्टार्टअप’ पुणे येथील आहेत.
शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका !
‘महाराष्ट्रातील एका नेत्यामुळे राजकारण अस्थिर झाले आहे, महाराष्ट्रातील एका नेत्याने हा खेळ ४५ वर्षांपूर्वी चालू केला. त्यानंतर अनेक मुख्यमंत्र्यांची पदे अस्थिर झाली. हे भटके आत्मे केवळ विरोधकांनाच अस्थिर करत नाहीत, तर स्वतःच्या पक्षालाही अस्थिर करतात. एवढेच नाही, तर स्वतःच्या कुटुंबातही अस्थिरता निर्माण होते. या भटक्या आत्म्याने वर्ष १९९५ च्या आघाडी सरकारलाही अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता आणि वर्ष २०१९ मध्ये या आत्म्याने जनादेशाचा अपमान केला’, असे म्हणत मोदींनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ‘गरिबी कधी हटवणार, असे विचारले तर राहुल गांधी म्हणतात खटाखट’, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवरही निशाणा साधला आहे. या भूमीवर महात्मा फुले, जोतिबा फुले यांच्यासारखे समाजसुधारक दिले. पुणे जेवढे प्राचीन आणि तेवढेच ‘फ्युचरिस्टिट’ आहे’, असेही मोदी यांनी म्हटले आहे.