रामायण आणि भारताचे परराष्ट्र धोरण

परराष्ट्र धोरणाची अनेक अंगे आहेत. त्यांतील सांस्कृतिक कूटनीतीचे महत्त्व अधिक आहे. भारताकडे मोठी सांस्कृतिक परंपरा आहे. त्यात रामाचे महात्म्य आणि महत्त्व अगाध आहे. ‘सब नर करहिं परस्पर प्रीती । चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती ॥’, म्हणजेच सर्वांमध्ये सामाजिक सौहार्द, परस्पर विश्वास आणि प्रेमाचे वातावरण असावे. ‘सगळे आपापले धर्म आणि उत्तरदायित्व पार पाडत आहेत’, याची जाणीव प्रत्येकास असावी. हे रामायणातील उद्बोधन जगासाठी शांततेचा संदेश आहे आणि त्यामुळेच रामायण ही भारताने जगाला दिलेली सुंदर भेट आहे.


१. जगभरात रामायणाविषयी असलेले कुतूहल

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी समर्पक शब्दांत श्रीरामाचे वर्णन केले होते. ‘राम म्हणजे आधुनिकता आणि विचारांची मुक्तता; म्हणूनच तो सर्वव्यापी आहे, सर्व मानवजातीचा आहे. त्यामुळे राम हा भारताच्या ‘विविधतेतील एकतेचा’ धागा आहे’, असे मोदी यांनी म्हटले होते. वर्ष २०२० मध्ये ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ब्रिटनमध्ये दिवाळीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात म्हटले होते, ‘ज्या प्रकारे रामाने आणि सीतेने रावणाचा विनाश केला, त्याप्रमाणे आपण कोरोना महामारीवर विजय मिळवू.’ यावरून आंतरराष्ट्रीय जगतातही ‘रामो राजमणिः सदा विजयते ।’ हे प्रचंड भिनले आहे, असे लक्षात येते. भारताने ब्राझीलला कोरोना लसींच्या रूपाने साहाय्य पाठवल्यावर तेथील राष्ट्राध्यक्ष बोलसेनारो यांनी या साहाय्याला थेट ‘हनुमानाच्या संजीवनी बुटी’शी जोडणे आणि तसे छायाचित्र ‘ट्वीट’ करणे, यातूनही रामायणाविषयीचे कुतूहल जगात किती आहे, हे प्रकर्षाने जाणवते.

२. विविध देशांमध्ये संबंध प्रस्थापित करण्यात रामायण प्रभावी माध्यम

मोदी सरकारच्या ‘ॲक्ट ईस्ट पॉलिसी’साठी (मध्य पूर्व अशियायी देशांशी संबंध वाढवणे) राम हा महत्त्वाचा सांस्कृतिक दुवा आहे. लाओसमध्ये ‘फ्रा लक फ्रा राम’, कंबोडियामध्ये ‘रामकेर्ती’, थायलंडमध्ये ‘रामाकिएन’ इत्यादी रामायणाच्या कथा पूर्वापार चालत आल्या आहेत आणि त्या अजूनही जपल्या जात आहेत. रामायण हे भारताला दक्षिण पूर्व आशियायी देशांशी जोडणारे प्रभावी माध्यम आहे. अगदी मोदींच्या इंडोनेशियन भेटीच्या वेळी आणि त्यानंतरही जगातील सगळ्यात मोठी इस्लामिक वस्ती असूनही इंडोनेशियाने रामायणाची नोंद घेतली. वर्ष २०१९ मध्ये जकार्तामध्ये रामायणावर आधारित ‘पतंग महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले. त्यासह रामायणाचा ‘आंतरराष्ट्रीय महोत्सव’ आयोजित करण्यात आला. या महोत्सवानंतर रामावर प्रचंड श्रद्धा असणार्‍या इंडोनेशियातील जावा बेटावरील नागरिकांना आपोआपच भारताविषयी आदर आणि जवळीक वाटू लागली. ‘अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न हिने इसवी सनाच्या पहिल्या शतकात सुरो या कोरियन राजाशी लग्न केले’, अशी आख्यायिका दक्षिण कोरियात आहे. यामुळे अनेक कोरियन लोक प्रतिवर्षी अयोध्येला भेट देतात. याच संदर्भात मागे एकदा दक्षिण कोरियातील तात्कालिक राष्ट्रपतींच्या पत्नीने अयोध्येतील दीपावली उत्सवात सहभाग घेतला होता. या भेटीगाठींमुळेच दक्षिण कोरिया आणि भारतातील धार्मिक जनसंवादाला अधिक वाव मिळतो. जपानच्या दिग्दर्शकाने बनवलेले ‘ॲनिमेटेड रामायण’ बघतच आमची पिढी मोठी झाली आहे. जातक कथेतील दशरथाची कहाणी ज्यात बुद्धांनी मागील एका जन्मात आपण ‘स्वयं राम’ असल्याचे सांगितले आहे. यावरून रामाविषयीची शाक्यमुनींची असलेली श्रद्धा बुद्ध धर्माचे पालन करणार्‍या आशियायी नागरिकांमध्येही आहे.

३. भारताच्या ‘रामायण सर्किट’ या प्रकल्पाचा उद्देश

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘रामायण सर्किट’ या प्रकल्पामुळे आशियायी देशांना ‘राम’ नामाच्या एका सांस्कृतिक धाग्यात बांधणे सहज शक्य होणार आहे. यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर लोकांचा संवाद वाढवणे, व्यवसायांना प्रोत्साहन देणे आणि सरकारी संवाद वाढवणे, हा त्यामागील महत्त्वाचा उद्देश आहे. या ‘रामायण सर्किट’मुळे भारतात मधुबनी चित्र काढणार्‍या कलाकारांना आंतरराष्ट्रीय संधी निर्माण होतील आणि रामायणाशी संबंधित छोट्या व्यवसायांना चालना मिळेल. त्यासह कोरिया, जपान, जावा, कंबोडिया यांसारख्या देशांमध्ये संस्कृतीचा अभ्यास करणार्‍या नव्या पिढीला रामायणाच्या विविध ग्रंथांच्या अनुवादित आवृत्त्याही सहज उपलब्ध होतील. सांस्कृतिक पर्यटनाच्या निमित्ताने आशियायी सरकारांमध्ये संवाद प्रस्थापित करणे सोपे होईल. म्हणूनच आशियायी देशांतील संबंध अधिक वृद्धींगत करण्यासाठी रामायणाचा बहुआयामी दृष्टीकोन स्वीकारणे, ही काळाची आवश्यकता आहे.

‘अहिंसा, दया, विद्वत्ता, सुशील, आत्मसंयम आणि शांत चित्त हे गुण मर्यादा पुरुषोत्तमाची शोभा वाढवतात’, अशा वचनाचा संस्कृत श्लोक आहे. रामाकडून आत्मसात् केलेले हेच ६ गुण परराष्ट्र धोरणाची मुख्य उद्दिष्ट म्हणून सहस्रो वर्षांपासून भारताची शोभा वाढवत आहेत.

– शांभवी प्रमोद थिटे, नवी देहली.

(लेखिका जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात परराष्ट्र धोरणासंबंधीच्या अभ्यासक आहेत.)

(साभार : शांभवी थिटे यांचे फेसबूक)