‘पुणे जिल्ह्यात श्रीरामनवमीपासून ते हनुमान जयंती या काळात युवावर्गासाठी ७ दिवस बलोपासना वर्ग आणि शौर्य वर्ग असे २ ‘ऑनलाईन’ वर्ग चालू होते. त्यातील युवतींचा वर्ग घेतांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.
१. श्री दुर्गादेवीचे अस्तित्व असलेल्या खोलीत प्रशिक्षणवर्गाशी संबंधित सेवा करणे
‘वर्ष २०२१ मध्ये मिरज आश्रमात असतांना मी प्रशिक्षणवर्ग आणि त्या संबंधीच्या सर्व सेवा श्री दुर्गादेवीचे अस्तित्व असलेल्या खोलीत करत आहे. (या खोलीत श्री दुर्गादेवीने सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना प्रत्यक्ष दर्शन दिले होते.) या खोलीत प्रशिक्षणवर्ग घ्यायला मिळालेली संधी म्हणजे जणूकाही ‘मी श्री दुर्गादेवीच्या स्वाधीन झाले आहे’, असेच अनुभवले.
२. श्री दुर्गादेवीच्या चित्रासमोर उभे राहून शरणागतभावाने आणि असमर्थतेने प्रार्थना करणे
वर्ग चालू होण्यापूर्वी काही मिनिटे श्री दुर्गादेवीच्या चित्रासमोर उभे राहून पूर्ण शरणागतभावाने आणि असमर्थतेने प्रार्थना केली की, ‘आज वर्ग घेतांना माझा देह केवळ माध्यम आहे. देवी, आज तूच हा वर्ग घे. माझी काहीच क्षमता किंवा पात्रता नाही. तुझे अस्तित्व या देहात निर्माण होऊ दे आणि तुझ्यातील शक्ती प्रत्येकाला अनुभवता येऊ दे. ती शक्ती प्रत्येक युवतीमध्ये निर्माण होऊ दे.’ यानंतर ‘वर्ग चालू झाला आणि वर्ग संपला’, एवढेच मला आठवत होते. त्या दिवशी वर्गात जे झाले, ते माझे नव्हतेच.
३. श्री दुर्गादेवीच वर्ग घेत असल्याचे प्रशिक्षणार्थींना वाटणे आणि तेथे देवीचे अस्तित्व अनुभवणे
शेवटच्या सत्रात सर्व सहभागी युवतींनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्या वेळी बोलणार्या प्रत्येकीने सांगितले, ‘‘आज वर्गात श्री दुर्गादेवीचे अस्तित्व अनुभवता आले.’’ २ – ३ युवतींनी सांगितले, ‘‘आज वर्ग श्री दुर्गादेवीच घेत आहे’, असे वाटत होते.’’ त्या वेळी मी जे अनुभवले, ते शब्दांत सांगू शकत नाही. त्या वेळी देवी माझ्या हाकेला धावून आल्याचे मी अनुभवले. ‘आपला देव आपल्यासाठी किती करतो’, असे जाणवून पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
– कु. प्राची विजय शिंत्रे, पुणे
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |