Mumbai Child Trafficking Racket Busted : मुंबईत बाळांची विक्री करणारी टोळी कार्यरत, ७ जणांना अटक !

बाळांची विक्री करणारी टोळी

मुंबई : मुंबईमध्ये बाळांची विक्री करणारी टोळी कार्यरत असून या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ७ जणांना अटक केले आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

वंदना पवार, शीतल वारे, स्नेहा सूर्यवंशी, नसीमा खान, लता सुरवाडे, शरद देवर आणि डॉ. संजय खंदारे अशी आरोपींची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत १४ बाळांची विक्री केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. यामध्ये ११ मुलेे आणि ३ मुली यांचा समावेश आहे. यांतील २ बाळांची सुखरूप सुटका करण्यात यश आले आहे. ही सर्व मुले ५ दिवस ते ९ महिने या वयोगटांतील आहेत, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईमधील काही रुग्णालयांमध्ये हे आरोपी काम करत होते.

डॉ. संजय खंदारे याचा दिवा (जिल्हा ठाणे) येथे दवाखाना आहे. हा मूळचा नांदेड येथील रहाणारा आहे. विक्रोळी (मुंबई) येथील एका बाळाची रत्नागिरी येथे विक्री करण्यात आली होती. तेलंगाणा आणि हैदराबाद येथून मुलांची मागणी अधिक होती. पालकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांना मुलांची विक्री करण्यास भाग पाडले जायचे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याविषयी पुढील अन्वेषण चालू आहे.