Pakistan New Deputy PM : इशाक डार बनले पाकिस्तानचे नवे उपपंतप्रधान !

इशाक डार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांना पाकिस्तानचे उपपंतप्रधान बनवण्यात आल्याची घोषणा २८ एप्रिल या दिवशी करण्यात आली. वर्ष २०१२ नंतर असे प्रथमच होत आहे की, या पदावर कुणा नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्या आदेशानुसार डार यांची ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यात आली आहे. गेल्याच महिन्यात डार यांना परराष्ट्रमंत्री बनवण्यात आले होते.

इशाक डार हे ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ’चे ज्येष्ठ नेते असून नवाझ शरीफ कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात. ते मूळचे काश्मिरी असून व्यवसायाने ‘चार्टर्ड अकाउंटंट’ आहेत. याआधी ते ४ वेळा अर्थमंत्री होते. त्यांची नियुक्ती अशा वेळी होत आहे, जेव्हा पाकिस्तान आर्थिक डबघाईला आला असून तो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून अधिक आर्थिक साहाय्य (बेलआऊट पॅकेज) मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डार यांना भारताशी पुन्हा व्यापार चालू करायचीही इच्छा आहे.