रत्नागिरी – रत्नागिरी–सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढावे आणि मतदारांना शांततापूर्ण, तसेच सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी सर्व अधिकार्यांनी आवश्यक ते प्रयत्न करावेत. त्या दृष्टीने मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा करून त्याची माहिती मतदारांना द्यावी, असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस्. चोक्कलिंगम यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात चोक्कलिंगम यांनी आढावा बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम म्हणाले,
१. लोकसभा निवडणूक मुक्त निर्भय आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. तीव्र उन्हाची दक्षता घेवून मतदारांना रांगेमध्ये उभे राहू नये, यासाठी प्रतीक्षा कक्षाची सुविधा ठेवा. त्याचसमवेत पावसाचा अंदाज आणि मागील अनुभव घेवून त्याविषयीही दक्षता घ्यावी.
२. निवडणुकीत मद्य, पैसा याचा वापर टाळण्यासाठी भरारी पथके, स्थीर निगराणी पथकांना अधिक सक्रीय करा. वन विभागाचे तपासणी नाके चालू करावेत, असे सांगून ते म्हणाले, कायमस्वरूपी स्ट्राँग रूम, मतमोजणी केंद्र निर्मितीसाठी विशेष प्रयत्न करावेत. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे. ‘वेबकास्ट्रींग’द्वारे नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवा.
३. निवडणूक प्रक्रिया चालू असतांना कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यावर विशेष लक्ष ठेवावे. कुठेही अशी घटना लक्षात आल्यास वेळीच उपाय योजना कराव्यात.
४. मतदार माहिती चिठ्ठीचे वाटप वेळेत करा. मतदानाची टक्केवारी वाढविण्यावरही विशेष भर द्यावा. सुक्ष्म निरीक्षक हे सर्वसाधारण निरीक्षकांचे, तर सर्वसाधारण निरीक्षक हे भारत निवडणूक आयोगाचे कान आणि डोळे सतात. त्यादृष्टीने नोंदी ठेवून अहवाल सादर करावा. तुम्ही सर्वांनी चांगली तयारी केल्याचे सांगून, त्यांनी सर्वांना शुभेच्छाही दिल्या.