तुम्हाला विनाश हवा कि विकास, हे ठरवण्याची हीच वेळ ! – उद्धव ठाकरे

रत्नागिरी – गद्दारांच्या राज्यात एक तरी प्रकल्प कोकणात आला का ? निदान लघु सुक्ष्म तरी प्रकल्प आणला का ? कोकण हे आमचे शिवसेनेचे वैभव आहे, आमची घराणेशाही येथील जनतेला चालते. कर्तृत्वशून्य तुम्ही आहात. फडणवीस आले आणि त्यांनी ‘यांना मत कि त्यांना मत’ ही भाषा केली. कोकणात गुंडा राज होते. पुन्हा तुम्हाला गुंडा राज हवे आहे का ? बारसूमधील माय-भगींनींना मारहाण झाली; पण शिवसेना मध्ये पडल्याने त्यांचा खेळ थांबला. जैतापूरला तर त्यांनी गोळ्याच घातल्यात. यांच्या गोष्टी विनाशाच्याच आहेत. आता पण तेच चालू आहे, त्यामुळे आपले येणारे सरकार बारसू-जैतापूर किंवा कोकणात विनाशकारी प्रकल्प येऊ देणार नाही. सरकारच्या कागदावरून असले प्रकल्प पुसून टाकेन, हे वचन मी तुम्हाला देतो. येथील भाजपचे अंधभक्त आहेत, त्यांना मी विचारतो, तुम्ही प्रचार कुणाचा करताय ? तुम्हाला विनाशाचा प्रचार हवाय का. आम्ही विकासाच्या गोष्टी करतोय आणि तुम्ही मात्र विनाशाच्या गोष्टी करता आहात. त्यामुळे त्यांना मत म्हणजे विनाशाला मत. एका बाजूला विनाश, तर दुसर्‍या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे. तुम्हाला काय निवडायचंय ते तुम्ही निवडा, असे आवाहन येथील सहस्रोंच्या सभेत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, कोकण हे शिवसेनेचे हृदय आहे. विनायक राऊत, भास्कर जाधव, राजन साळवी मला तुमचा अभिमान आहे. शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला; पण तुम्ही ठाम उभे आहात. त्यांनी शिवसेना फोडली, शिवसेना चोरली, गद्यारांकडे बाण दिला, आता मात्र त्यांच्याच जागा कापल्या, उमेदवार बदलले आणि आपला कोकणातील बाणही गायब केला. यांचे २ मालक शिवसेनेचे नाते तोडायला निघालेत. कोकणात जांबा दगड हा कुणी एके काळी लाव्हारस होता. आता हाच लाव्हारस भाजपच्या विरोधात उसळत आहे. त्यामुळे मोदींना आज सूर मिळत नाही. आय पी एल (इंडियन पॉलिटिकल लिग) मधील खेळाडू इकडून तिकडे तिकडून इकडे जात आहे. नाकर्त्यांच्या हातात भाजप गेल्यामुळे अटलजींचा आत्मा रडत असेल. शिवसेना बरोबरीला असतांना मोदी आणि शहा यांना महाराष्ट्रात सभा घ्यायला लागल्या होत्या का ? पण आता शिवसेना सोबत नाही; म्हणून त्यांना महाराष्ट्रात यावे लागते. ‘अबकी बार भाजप तडीपार’ जसे यांनी कांदा काजू निर्यात केला, तसे भाजपला निर्यात करा.’’