रत्नागिरी – सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने पीअर रिव्ह्यू आणि जी.एस्.टी. मधील सध्याचे प्रश्न या विषयावर एक दिवसांचे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले. हॉटेल विवा एक्झिक्यूटिव्ह येथे आयोजित सत्रात पुणे सीए शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी आणि रत्नागिरीतील अधिवक्ता अभिजित बेर्डे यांनी मार्गदर्शन केले. सरस्वतीपूजन, दीपप्रज्वलन आणि ‘सीए मोटो साँग’ने कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
पहिल्या सत्राच्या सीए अमृता कुलकर्णी यांनी पीअर रिव्ह्यूसाठी चार्टर्ड अकाउंट्सनी आपल्या कार्यालयामध्ये लेखा परीक्षणासंदर्भातील दस्तऐवज आणि कागदपत्र यांचे व्यवस्थापन कसे करावे ? याबद्दल मार्गदर्शन केले. लेखा परीक्षण करताना अवलंबलेल्या प्रक्रिया आणि पद्धती योग्य रितीने कशा नोंद करून ठेवाव्यात ? यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. सीए इन्स्टिट्यूटने सनदी लेखापालांच्या कामाचे पुनरावलोकन करण्यासाठी स्थापन केलेल्या पीअर रिव्ह्यू बोर्ड आणि त्यांच्या कार्यप्रणालीची ही थोडक्यात माहिती त्यांनी दिली.
दुपारच्या सत्रात रत्नागिरीतील प्रसिद्ध जी.एस्.टी. सल्लागार अधिवक्ता अभिजित बेर्डे यांनी जी.एस्.टी. कायद्यातील विविध प्रश्न आणि त्या संदर्भातील सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयांवर चर्चा केली. जी.एस्.टी. नोंदणी, अपील, भूमींच्या व्यवहारावरील कर आकारणी, उत्खनन रॉयल्टीसंदर्भातील जी.एस्.टी. तरतुदी या संदर्भातील सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जी.एस्.टी. ॲडव्हान्स रूलिंग ॲथॉरिटीच्या निर्णयांच्या अनुषंगाने सखोल विवेचन त्यांनी केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना चर्चेच्या माध्यमातून समर्पक अशी उत्तरे दिली.