जागरण आणि गोंधळ यांचे बीभत्स आणि अश्लील स्वरूप !
महाराष्ट्रातील प्राचीन जागरण-गोंधळ या धार्मिक विधींमध्ये काही लोकांनी अश्लीलता आणून त्याचा व्यवसाय केला असल्याची तक्रार ‘गोंधळी समाजसेवा संघटने’ने धाराशिव जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. अशा प्रकारे ‘धार्मिक विधींचे हनन करणार्या लोकांवर कायदेशीर कारवाई करावी’, अशी मागणीही संघटनेने केली आहे. काही ठिकाणी जागरण गोंधळाच्या नावाखाली तमाशातील नृत्यांगना सहभागी होत आहेत. या विधीकाळात तमाशातील वाद्य, ढोलकी, ऑर्गन, ढोल वाजवून अश्लील नृत्य केले जात आहे. यामुळे पारंपरिक जागरण-गोंधळ या धार्मिक विधीला बीभत्स आणि अश्लील स्वरूप येऊन मूळ विधीचे पावित्र्य भंग झाले आहे.
गाेंधळाचा ऐतिहासिक संदर्भ
विष्णूच्या कर्णमलापासून निर्माण झालेल्या शुंभ आणि निशुंभ या दैत्यांनी त्रिलोकी उच्छाद मांडला होता. तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी सर्व देव आणि ऋषि यांनी आदिमाया शक्तीची विविध वाद्यांच्या नाद-सुर यांच्या माध्यमातून आळवणी केली, अर्थात् गोंधळ घातला. तेव्हापासून हिंदु धर्मियांमध्ये गोंधळाची परंपरा चालू झाली. या परंपरेत निरनिराळ्या देवतांना गोंधळी ‘गोंधळा’ला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात.
देवतेचे तत्त्व जागृत करणारे ते जागरण !
कुलस्वामी श्री खंडेरायाच्या कुलाचारांमध्ये ‘जागरण’ हा प्रमुख भाग आहे. जसे देवीच्या कुलाचारातील ‘गोंधळ’ हा प्रमुख भाग आहे, तितकेच महत्त्व जागरणाला आहे. आज जागरण हा शब्द ‘रात्रभर जागणे’ यापुरता मर्यादित स्वरूपात पाहिला जातो; परंतु ‘जागरण’ या शब्दाचा अर्थ ‘जागृत करणे’ होय. आपली आंतरिक शक्ती जागृत करणे, आपला कुलस्वामी (देवतेचे तत्त्व) जागृत करणे, म्हणजे जागरण ! जागरण हा एक विधी आहे, ज्यामध्ये विशिष्ट इच्छा पूर्ण झाल्यानंतर रात्रभर देवतेचे स्मरण करत जागरण केले जाते. जागरणाच्या परंपरेविषयी वाघ्या त्याच्या कथनातून सांगतो की, पहिले जागरण श्रीकृष्णाने घातले होते; म्हणून ते सर्र्वांना लागू झाले. जागरणाचा आरंभ करतांना सर्व देवतांना चौकावर येण्याचे आवाहन केले जाते. श्री खंडोबाचे उपासक असलेले वाघ्या-मुरळी जागरण करून श्री खंडोबाचे जीवनचरित्र उलगडून सांगतात. खंडोबाच्या या उपासकांचा उल्लेख संतसाहित्यात आढळतो. नवस, लग्न, मुंज, वास्तूशांती, नवरात्र अशा विधींच्या प्रसंगी हे धार्मिक विधी केले जातात; मात्र सध्या याला व्यवसायाचे स्वरूप आले आहे.
जागरण किंवा गोंधळ यामध्ये देवतेचे तत्त्व, म्हणजे चैतन्य ग्रहण करण्यासाठी देवतेला आवाहन करून बोलावले जाते. हे शास्त्र आधुनिक हिंदूंना माहीत नाही किंवा त्याची जाणीव काही हिंदूंना राहिलेली नाही. त्यामुळे व्यावसायिकतेच्या नावाखाली त्यांनी त्याचे स्वरूप अश्लील किंवा बीभत्स केले आहे. यामुळे अशा प्रकारे जागरण किंवा गोंधळ यांचे विकृतीकरण करणारे आणि पहाणारे यांच्यावर देवतेची कृपा होण्याच्या ऐवजी तिची अवकृपाच होईल, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे ! – संपादक
अश्लील गीते सादर करणारे हल्लीचे वाघ्या-मुरळी !
अलीकडच्या काळात जागरणातील वाघ्या-मुरळीच्या गटांमध्ये स्पर्धा वाढली असून ज्या गटात मुरळी तरुण, सुंदर, चांगली नृत्य करणारी आहे, त्याच गटाला बोलावले जाते. खंडोबाचे कथागीत आणि महिमा वर्णन करणारी गाणी न म्हणता सरळ सरळ चित्रपटातील उडत्या चालीची गाणी आणि अश्लील लोकगीते वाघ्या-मुरळी नृत्याविष्कारासह सादर करतात. हे बघणार्या लोकांनाही याचे काही वाटत नाही. यातील ‘बतावणी’ हा भाग सादर करत असतांना विनोदामध्ये अश्लील शब्दांचा वापर सर्रास केला जातो. मुरळी ही स्त्री असूनही त्यात सहभाग असते. अश्लील हावभाव, संवाद वापरून ते रसिकांचे मनोरंजन (?) करतात. वाघ्याची दिमडी, मुरळीची घाटी, तुणतुणे, पेटी यांऐवजी आधुनिक वाद्यांचा वापर केला जातो.
अशा प्रकारे देवता आणि परंपरा यांची थट्टा केली जात आहे. आपल्या या अनास्थेला ‘कांतारा’सारखा चित्रपट एक सणसणीत उत्तर आहे ! या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी ‘पंजुरली’ (म्हणजे भगवान विष्णूचे श्री वराह अवतार) या देवतेविषयीच्या लुप्त होत असलेल्या परंपरेला नवसंजीवनी मिळवून दिली आहे. आपणही महाराष्ट्रातील आपली ही लोककला टिकवली आणि वाढवली पाहिजे, याची जाणीव आज या लोककलावंतांना आणि ज्यांच्यापुढे ते हे सादर करतात त्यांना करून देण्याची आवश्यकता आहे !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे