Militants Open Fire in Kashmir: काश्मीर येथील बसंतगड आणि मीरान साहिब येथे आतंकवाद्यांकडून गोळीबार !

  • ग्रामरक्षक घायाळ

  • लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आक्रमणांच्या संख्येत वाढ

जम्मू – जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात असलेल्या बसंतगडमधील पनारा गावात २७ एप्रिलला गोळीबार झाला. यात ‘व्हिलेज डिफेन्स गार्ड’ म्हणजे ग्रामरक्षक घायाळ झाला. काही ग्रामरक्षक जंगलात गस्त घालत असतांना काही आतंकवाद्यांकडून हा गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या आक्रमणानंतर पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत २७ एप्रिलच्या रात्री अज्ञात आक्रमणकार्‍यांनी मीरान साहिब भागातील आम आदमी पक्षाच्या नेत्याच्या मिठाईच्या दुकानावर गोळीबार केला. या घटनेत कुणी घायाळ झाल्याचे वृत्त नाही. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मीरान साहिब परिसरात पोचले. ‘अब्बू जट्ट’ नावाच्या सोशल मीडिया हँडलने या आक्रमणाचे दायित्व घेतले आहे.

गेल्या महिन्याभरात काश्मिरात हिंदूंविरोधातील ‘लक्ष्यित हिंसे’च्या घटनांत वाढ !

१. १७ एप्रिल : अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारामध्ये आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात बिहारचा रहिवासी शंकर शहा ठार झाला.

२. ८ एप्रिल : शोपिया जिल्ह्यातील पदपवन येथे आतंकवाद्यांनी देहलीचा रहिवासी असलेला चालक परमजीत सिंह यांना गोळ्या घातल्या.

जम्मू-काश्मीरमध्ये ५ टप्प्यांत मतदान !

जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेचे ५ मतदारसंघ असून तेथे ५ टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला उधमपूर, दुसर्‍या टप्प्यात २६ एप्रिलला जम्मू, तिसर्‍या टप्प्यात ७ मे या दिवशी अनंतनाग, चौथ्या टप्प्यात १३ मे या दिवशी श्रीनगर, तर पाचव्या टप्प्यात २० मेला बारामुल्ला मतदारसंघात मतदान होणार आहे.

संपादकीय भूमिका 

जिहादी आतंकवादाचा जनक असलेल्या पाकिस्तानकडूनच ही आक्रमणे संचालित केली जात असल्याने आधी पाकव्याप्त काश्मीर नियंत्रणात घेऊन नंतर पाकचे समूळ उच्चाटनच केले पाहिजे !