MDH Masala Row : आमच्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचा वापर केला जात नाही !

एम्.डी.एच्. आस्थापनाने हाँगकाँग आणि सिंगापूर यांचे दावे फेटाळले !

नवी देहली – भारतीय आस्थापन ‘एम्.डी.एच्.’च्या ३ मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचे प्रमाण नियमापेक्षा अधिक आढळल्याने हाँगकाँग आणि सिंगापूर येथे या मसाल्यांवर बंदी घातली आहे. इथिलीन ऑक्साईडमुळे कर्करोग होतो, असे सांगण्यात आले आहे. आता यावर एम्.डी.एच्.कडून निवेदन प्रसारित करण्यात आले आहे. या आस्थापनाने दावा केला आहे की, त्यांची उत्पादने १०० टक्के सुरक्षित आहे. तसेच या आस्थापनाने हाँगकाँग आणि सिंगापूर येथील अन्न नियामकांकडून त्यांच्या काही उत्पादनांमध्ये कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड आढळल्याचे दावे फेटाळले आहेत.

निवेदनात एम्.डी.एच्. आस्थापनाने म्हटले आहे की, आम्हाला हाँगकाँग आणि सिंगापूर अन्न सुरक्षा नियामकांकडून कोणतेही पत्र मिळालेले नाही. आमच्या काही उत्पादनांमध्ये कर्करोगजन्य पदार्थ इथिलीन ऑक्साईडचा समावेश असल्याचे दावे असत्य आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. भारतीय अन्न नियामक मंडळाला या प्रकरणाबाबत हाँगकाँग किंवा सिंगापूर अधिकार्‍यांकडून कोणताही चाचणी अहवाल प्राप्त झालेला नाही. आम्ही त्यांच्या ग्राहकांना सर्व उत्पादनांच्या सुरक्षिततेबद्दल आणि गुणवत्तेबद्दल आश्‍वस्त करतो. मसाल्यांच्या साठवण, प्रक्रिया किंवा पॅकिंग अशा कोणत्याही टप्प्यात इथिलीन ऑक्साईड वापरले जात नाही. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोग्य अन् सुरक्षा मानकांचे आस्थापनांकडून पालन केले जाते.

एम्.डी.एच्.च्या मद्रास करी पावडर, सांभर मसाला, मिश्र मसाला पावडर आणि करी मसाला पावडर या ३ मसाल्यांवर हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आली आहे.