अनुग्रह

१. सद्गुरूंनी आपल्या शिष्याला शारीरिक तथा मानसिक असे दोन्ही स्वरूपांचे बळ देणे

‘साधकाच्या दृष्टीने अत्यंत पायाभूत गरजा ३ आहेत. एक निश्चित दिशा, दुसरी परमनिष्ठा आणि तिसरी मार्गक्रमण करण्याकरता लागणारे बळ. केवळ दिशा कळूनही उपयोग नाही किंवा निष्ठा असूनही उपयोग नाही. किंबहुना बळ असणे, हे अधिक महत्त्वाचे. अध्यात्मात शारीरिक तथा मानसिक दोन्ही स्वरूपांचे बळ आवश्यक आहे. बळाखेरीज उभारी आणि जिद्द निर्माण होत नाही. तेच कार्य सद्गुरु आपल्या शिष्याविषयी स्वतःचे बळ देऊन करत असतात.

२. अनुग्रहाचा क्षण हा खर्‍या साधकदशेचा जन्म असणे

बलसंक्रमण ४ प्रकारे होत असते – नेत्र, स्पर्श, शब्द,  संकल्प.

बलसंक्रमण कुठल्याही पद्धतीने केले, तरी परिणाम एकच असतो. कोणती पद्धत वापरणे, हे सद्गुरूंच्या स्वतःच्या योग्यतेवर, तसेच इच्छेवर अवलंबून असते. कसेही असले, तरी या प्रक्रियेलाच ‘अनुग्रह’ असे म्हणतात. अनुग्रहाचा क्षण हा खर्‍या साधकदशेचा जन्म असतो. या क्षणापासूनच गुरु-शिष्यांत पितापुत्रांचे नाते प्रस्थापित होते आणि येथूनच अध्यात्मजीवनाची वाटचाल चालू होते.’

– स्वामी विद्यानंद

(साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)