काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे ! – छ. उदयनराजे भोसले

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा  –  ‘चारसौ पार’ म्हणजे राज्यघटना संपवण्याचा प्रयत्न अशी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात आहे; पण राज्यघटनेचा खात्मा काँग्रेस पक्षाने मागेच केला आहे. आणीबाणी आणली. लागू केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने काय नाही केले ? याची सूची मोठी आहे. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची सूची लांबलचक आहे, असे वक्तव्य  भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी येथे केले.

पुरावे आणि माणसे गायब करणे, ही काँग्रेसची परंपरा !

पुरावे गायब करण्याची काँग्रेसची पहिल्यापासूनच परंपरा आहे. पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे. गायब होणे हे असे सहजासहजी घडत नाही. काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल, तर अशी गायब होण्याची अनेक उदाहरणे देता येतील. हा योगायोग नक्कीच नाही. राजेश पायलट, माधवराव शिंदे, वाय.एस्. रेड्डी हेसुद्धा काँग्रेसमधीलच होते, पण ते नावारूपाला आल्यानंतर त्यांचा अपघात झाला, ही अपघाताची मालिका म्हणजे त्यांच्यावर बारकाईने विचार करण्यासारखी गोष्ट आहे, असा आरोप छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केला.