शिक्षण विभागाच्या खात्यातून पैसे चोरीचे प्रकरण !
मुंबई – महाराष्ट्र सरकारच्या शालेय विभागाच्या राज्य क्रीडा विकास निधीच्या बचत खात्यातून बनावट धनादेश आणि स्वाक्षरी यांद्वारे ४७ लाख ६० सहस्र रुपयांची चोरी झाल्याचे नुकतेच उघड झाले होते. २ मार्च या दिवशी झालेली ही चोरी ४ मार्च या दिवशी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकार्यांच्या लक्षात आली. २ दिवसांपूर्वी याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रने चोरीची सर्व रक्कम २४ एप्रिल या दिवशी शालेय शिक्षण विभागाच्या खात्यात जमा केली आहे.
ही चोरी १० बनावट धनादेशांद्वारे करण्यात आली असून चोरीचे सर्व धनादेश चेन्नई आणि कोलकाता येथून वटवण्यात आल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रकडून उघड करण्यात आले आहे. धनादेश बनावट असल्याचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या अधिकार्यांना समजून न आल्याने ही चोरी झाल्याचे बँक ऑफ महाराष्ट्रकडून मान्य करण्यात आले आहे.