शरिराची आग झाल्याने अन् सूज येत असल्याने नागरिक त्रस्त !
नाशिक – येथील जुने न्यायालय परिसरातील पिंपळाच्या झाडावर अनेक वर्षांपासून मधमाशांचे पोळे आहे. गेल्या ३ दिवसांपासून काही मधमाशा परिसरात फिरत आहेत. २३ एप्रिल या दिवशी सायंकाळी अचानक सर्व मधमाशांनी पोळ्यावरून उठत परिसरातील ७० ते ८० नागरिकांवर आक्रमण करत त्यांचा चावा घेतला. प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी १ ते दीड किलोमीटर दूर अंतरापर्यंत पळत होते.
एकेका व्यक्तीस २० ते २५ मधमाशा चावत होत्या. २२ एप्रिल या दिवशीही काही मधमाशांनी या परिसरातील नागरिकांना चावा घेतला, तर २४ एप्रिल या दिवशी दुपारीही हीच परिस्थिती होती. ज्या व्यक्तींना चावा घेतला आहे, त्यांच्या शरिराला सूज आली आहे. यामध्ये सर्वाधिक चावा तोंडावर घेतल्याने डोळे, गाल, गळा, कान, कपाळ असे अवयव सुजले आहेत.
‘मधमाशांना धुराचा उग्र वास अजिबात सहन होत नाही. मधमाशा अन्यथा आक्रमक होत नाही. त्यांच्या नैसर्गिक अधिवासात अडथळा आल्यास त्या आक्रमण करतात.
– नितीन कर्हाळे, मधमाशीतज्ञ, पिंपळगाव बसवंत |