नेतृत्व गुण असलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची ठाणे येथील कु. नम्रता योगेश कुलकर्णी (वय १२ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. नम्रता कुलकर्णी ही या पिढीतील एक आहे !

‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या ! 

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

(‘वर्ष २०२४ मध्येही कु. नम्रता योगेश कुलकर्णी हिची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.’ – संकलक )

चैत्र कृष्ण तृतीया (२७.४.२०२४) या दिवशी कु. नम्रता योगेश कुलकर्णी हिचा १२ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कु. नम्रता योगेश कुलकर्णी हिला १२ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी

१. सहनशीलता आणि इतरांचा विचार करणे

‘कु. नम्रताचे दात किडले होते; म्हणून मी नम्रताला दंतवैद्यांकडे घेऊन गेले होते. दंतवैद्य तिच्या दातांवर उपचार करतांना ‘ती रडली नाही’, यासाठी दंतवैद्यांनी तिचे कौतुक केले; मात्र चिकित्सालयाच्या बाहेर आल्यावर ती रडायला लागली आणि म्हणाली, ‘‘मी उपचार करतांना रडले असते, तर दंतवैद्यांना उपचार करता आले नसते.’’ यावरून ‘ती स्वतःच्या दुःखापेक्षा इतरांचा विचार अधिक करते’, असे लक्षात आले. तेव्हा ती केवळ ९ वर्षांची होती.

२. प्राण्यांविषयी प्रेम

नम्रताला मांजर आणि कुत्रा यांच्याविषयी विशेष प्रेम आहे. ती त्यांची प्रेमाने काळजी घेते. तिने घरी एक मांजरी पाळली होती. ती त्या मांजरीला आणि घराजवळच्या कुत्र्याच्या पिलांनाही दूध घालत असे.

३. समंजस

३ अ. आईला न्यूनपणा घेण्यास सुचवणे : एकदा मी आणि माझे यजमान काही कारणास्तव एकमेकांशी बोलत नव्हतो. यजमानांनी माझी क्षमा मागितल्यावरही माझा राग उणावत नव्हता. तेव्हा नम्रता मला म्हणाली, ‘‘आई, बाबांनी न्यूनपणा घेऊन तुझी क्षमा मागितली आहे. आता तूही न्यूनता घे.’’ असे सांगून तिने मला न्यूनता घेण्याची जाणीव करून दिली.

३ आ. दोन्ही मुलींनी घरी रहायची सिद्धता दाखवल्यामुळे न्यायालयीन सेवा करू शकणे : एकदा मला एका न्यायालयीन सेवेसाठी पुण्याला जायचे होते. त्याच दिवशी अकस्मात् माझ्या यजमानांनाही बाहेरगावी जायचे होते. माझ्या दोन्ही मुली (नम्रता आणि तिची मोठी बहीण कु. चैत्राली (आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १८ वर्षे)) मला म्हणाल्या, ‘‘आई, तू आमच्यासाठी थांबू नको. आम्ही दोघी घरी रहातो. तू काळजी करू नकोस. तू तुझी सेवा कर.’’ त्यामुळे मी सेवेसाठी पुण्याला जाऊ शकले.

४. प्रेमाने बोलून नकारात्मकता दूर करणे

मला एका सेवेसाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जायचे होते; पण मला बर्‍याच अडचणी येत होत्या, त्यामुळे मला निराशा आली होती. ‘मुलींना सोडून कसे जायचे ?’, स्वयंपाक करणे आणि नम्रताला शाळेत पोचवणे-आणणे इत्यादींविषयी मला काळजी वाटत होती. तेव्हा नम्रता मला म्हणाली, ‘‘तू केवळ स्वतःचा विचार करत नाहीस. तू माझा आणि इतरांचा विचार करत आहेस’, हे देवाला आवडेल.’’ तिच्या या बोलण्यामुळे माझ्या मनातील नकारात्मकता निघून गेली आणि अडचणींवर मात करून मी सेवेला जाऊ शकले.

५. शाळेतील कार्यक्रमात भाग घेऊन प्रत्येक कृती मनापासून करणे

ती शाळेत होणार्‍या ‘वक्तृत्व, रांगोळी, स्तोत्रपठण, विज्ञान’, अशा विविध स्पर्धांत भाग घेते.

अ. ती ‘लोकमान्य टिळकांचे विचार सर्वांच्या अंतर्ममनापर्यंत पोचावेत’, या भावाने लोकमान्य टिळकांवरचे भाषण करते.

आ. ती रामरक्षा म्हणतांना ‘ऐकणार्‍यांच्या मनात प्रभु श्रीरामांविषयी भाव जागृत होईल’, अशा भावाने म्हणते.

६. स्वभावदोष

मनाने करणे, अव्यवस्थितपणा, नियोजनाचा अभाव

‘हे भगवंता, नम्रतातील स्वभावदोष आणि अहं यांचा नाश होऊन तिचे चित्त शुद्ध होऊ दे. तूच तिची जलद आध्यत्मिक प्रगती करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (८.३.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.