‘जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ।’, ही उक्ती सार्थ ठरवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची थोरवी जाणत नसेल, असा साधक विरळाच ! आपण नेहमी ‘सनातन प्रभात’मध्ये त्यांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये, त्यांच्यातील दिव्यत्व इत्यादींविषयी वाचत असतो. काही साधकांकडून त्यांची महतीही ऐकत असतो. त्यांनी हे जे सर्व साध्य केले आहे, तो काही एका क्षणात झालेला चमत्कार नाही. जीवनाडीपट्टीत महर्षींनी सांगितल्याप्रमाणे त्या दैवी अवतार असल्या, तरी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी जो काही आध्यात्मिक अधिकार प्राप्त केला आहे, त्यासाठी त्यांना तसे कष्टही सोसावे लागले आहेत. कदाचित् हे अगदी थोड्या साधकांना ठाऊक असेल ! ‘मला पुष्कळ पूर्वीपासून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यासमवेत सेवा करण्याची संधी मिळाली’, हे मी माझे भाग्य समजतो. हे दिव्यत्व प्राप्त करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत आणि अनुभवलेही आहेत. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी राबवलेली अहंनिर्मूलनाची प्रक्रिया, वाईट शक्तींची सोसलेली भीषण आक्रमणे, दिवस-रात्र केलेली अविरत सेवा आदी काही गोष्टी येथे मांडत आहे. यातून त्यांच्यातील दैवी गुण लक्षात येऊन आपल्यामध्ये त्यांच्याप्रती निश्चितच कृतज्ञताभाव निर्माण होईल ! 

– श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, सनातन प्रभात. (१९.११.२०२४)    

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

उच्चभ्रू घराण्यातून येऊनही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सहजतेने स्वीकारलेले आश्रमजीवन आणि कठोरपणे राबवलेली अहंनिर्मूलनाची प्रक्रिया

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ‘स्वतःचा चेहरा आरशात पाहून ‘स्वतःमध्ये किती अहं जाणवतो ?’, ते अभ्यासायला सांगून साधकांना अहं निर्मूलनाचे प्रयत्न करायला सांगणे : श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ उच्चभ्रू घराण्यातून आलेल्या आहेत, तरीसुद्धा जेव्हा त्या फोंडा, गोवा येथील ‘सुखसागर’मध्ये रहायला आल्या, तेव्हा त्यांनी आश्रमजीवन सहजपणे स्वीकारले. तेव्हा (वर्ष २००१ मध्ये) आताप्रमाणे आढावासत्संग इत्यादी घेऊन स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याची पद्धत नव्हती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना थेटच स्वतःचा चेहरा आरशात पहायला सांगून ‘स्वतःमध्ये किती अहं जाणवतो ?’, ते अभ्यासायला सांगत आणि अहं नसलेल्या साधकांशी तुलना करायला सांगून त्यांच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करायला सांगत. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनाही त्यांनी याच पद्धतीने शिकवले. अर्थातच त्यांची तेवढी सिद्धता असल्याने त्यांनी ते तितक्याच सहजतेने स्वीकारून गुरूंचे आज्ञापालन केले.

श्री. योगेश जलतारे

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवतांना केलेले प्रयत्न ! : आश्रमजीवनात अहं निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्याचा आरंभही श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यापासूनच झाला. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतः सर्वप्रथम ती प्रक्रिया सूत्रबद्ध पद्धतीने राबवली आणि त्यानंतर समष्टीमध्ये ती त्या पद्धतीने राबवली जाऊ लागली. या प्रक्रियेच्या अंतर्गत त्यांनी पुष्कळ कष्ट घेतले. स्वतःतील स्वभावदोष घालवून गुण निर्माण होण्यासाठी त्या स्वतःच्या बारीक बारीक कृतींचे निरीक्षण करायच्या. मनात येणार्‍या अयोग्य विचारांचे निरीक्षण करायच्या आणि त्यावर तत्परतेने योग्य कृती करायच्या. मनात एखादा अयोग्य विचार आल्यास त्या क्षमायाचना करायच्या. त्यांनी सहजपणे ही प्रक्रिया राबवली. त्यांच्या प्रयत्नांवरूनच ‘अहं निर्मूलनासाठी साधना’ हा ग्रंथ सर्वप्रथम लिहिला गेला.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या या उदाहरणातून त्यांना मिळालेला आध्यात्मिक अधिकार हा सहजगत्या मिळालेला नाही, तर ‘त्यासाठी त्यांनी कठोर प्रयत्न केले आहेत’, हे सहजपणे लक्षात येते. मोठ्या वाईट शक्तीने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचा लिंगदेह त्यांच्या देहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करणे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या कृपेने त्यांचा जीव वाचणे वर्ष २००३-२००४ या वर्षभरात आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांवर मिरज येथील आश्रमात आध्यात्मिक स्तरावरील उपाय चालू होते. तेव्हा एका साधिकेला वाईट शक्तींचा तीव्र त्रास व्हायचा. याच कालावधीत श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यासुद्धा एकदा उपायांसाठी मिरज येथील आश्रमात आल्या होत्या. तेव्हा वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेली साधिका त्यांना म्हणाली, ‘‘मी तुम्हाला उच्च लोकांतील रागांचे ज्ञान देते.’’ त्यानंतर तिने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समोर बसून ध्यान लावले आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनाही ध्यान लावायला सांगितले.

ध्यानावस्थेतील एका क्षणी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ (वर्ष २०१०)

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ध्यानाच्या वेळी झालेले त्रास त्यांच्याच शब्दांत पुढे देत आहे, ‘मी ध्यानाला बसले आणि मला पुष्कळ त्रास होऊ लागला. माझ्या डोक्यावर मोठ्या प्रमाणात दाब वाढू लागला. मला श्वासही घेता येईना आणि माझा जीव घुसमटू लागला. माझे प्राण नाभीतून खेचल्यासारखे होऊन ते कंठाशी येऊ लागले. मी अगदी आर्ततेने परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा करू लागले आणि काही क्षणांत मला श्वास घेता येऊ लागला अन् थोड्या वेळाने मी पूर्ववत् झाले.’ याविषयी मी नंतर परात्पर गुरु डॉक्टरांना सर्व सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘वाईट शक्ती तुमचा लिंगदेह देहाबाहेर नेण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. वाईट शक्ती देहाबाहेर लिंगदेह नेऊन त्यावर नियंत्रण मिळवतात आणि आपली कामे करून घेतात.’’ केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे वाईट शक्तींचा हा प्रयत्न अयशस्वी झाला आणि गुरुदेवांनी माझा जीव वाचवला.’

सूक्ष्म ज्ञानप्राप्तीची साधना आणि वाईट शक्तींनी केलेली भीषण आक्रमणे !

सूक्ष्म ज्ञान मिळण्याची दैवी प्रक्रिया

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध प्रश्न विचारल्यावर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ज्ञान मिळवून त्याचे टंकलेखन, संकलन आणि मुद्रितशोधनही करून देणे : समष्टीला सूक्ष्मातील ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दिवस-रात्र कष्ट घेतले आहेत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामध्ये प्रश्नोत्तरांची जणू काही स्पर्धा चालू असे. गुरुदेव जितक्या गतीने आणि संख्येने प्रश्न विचारत, तितक्याच गतीने अन् जोमाने श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ त्यांची उत्तरे मिळवत असत. हे करत असतांना त्यांना रात्रीचेही भान रहात नसे. त्या वेळी त्यांना टंकलेखन करायला येत नव्हते; पण त्यांनी टंकलेखनासह संकलन आणि मुद्रितशोधनही शिकून घेतले अन् त्या ज्ञानाच्या लिखाणाचे थेट अंतिम संकलन करून धारिका देऊ लागल्या.

२. सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तीमुळे वाईट शक्तींची बरीच गुपिते उलगडली गेल्याने त्यांनी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर भीषण आक्रमणे करणे : हे अलौकिक ज्ञान प्राप्त करत असतांना वाईट शक्तींची बरीच गुपिते उलगडली जात होती. त्यामुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर वाईट शक्तींची भीषण आक्रमणे होत असत. परिणामस्वरूप ‘त्यांच्या देहामध्ये  प्रचंड उष्णता निर्माण होणे, देहावर सूज येणे, डोळे लाल होऊन जळजळणे’ आदी कितीतरी त्रास त्यांना सहन करावे लागत.

‘प्रबळ इच्छाशक्ती आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा’ यांमुळे अविरत सेवा करू शकणे             

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ ज्ञानार्जनाची सेवा करत, त्याच कालावधीमध्ये आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी रात्रंदिवस नामजपादी उपाय केले जात असत, म्हणजे संतांच्या किंवा उन्नत साधकांच्या सहवासात सामूहिक नामजप, प्रार्थना इत्यादी केले जात असे. त्या वेळी ‘साधकांचा आध्यात्मिक त्रास किती वाढला ? किंवा किती न्यून झाला ?’, हे नेमकेपणाने सांगू शकणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ या एकमेव होत्या. त्यातच परीक्षण आणि ज्ञानार्जन ! त्यांची ‘प्रबळ इच्छाशक्ती आणि गुरूंवरील अढळ श्रद्धा’ यांमुळे अविरत दिवस-रात्र त्या ज्ञानार्जनाची सेवा करू शकल्या.

संतांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांचे जीवघेण्या आजारांपासून रक्षण होणे

योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या भाकितानुसार श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर वर्ष २०१४ मध्ये ‘मोठे जीवघेणे संकट येणार होते; परंतु संतांच्या कृपाशीर्वादामुळे त्यांच्यावरील हे संकट टळले. जसे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे बर्‍याच महामृत्यूयोगांना सामोरे गेले आणि संतांच्या कृपेने त्यांनी त्या योगांवर मात केली, त्याचप्रमाणे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनीही त्यांच्या साधनाकाळात बरेच जीवघेणे त्रास सोसले; परंतु संतांच्या कृपेने त्यांच्यावरील संकटे दूर झाली.

आध्यात्मिक त्रास असणार्‍या साधकांना प्रेमाने आधार आणि साधनेची दिशा देणे

विविध प्रकारचे आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांच्या मनात त्रासांमुळे खचून जाऊन साधना सोडण्याचे विचारही येत; परंतु श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्व साधकांशी जवळीक साधत त्यांचे एकत्र सत्संग घेतले आणि त्यांना बोलते केले. या सत्संगांत काकूंनी त्यांचे त्रास समजून घेऊन त्यांना त्यांच्या स्तरावर जाऊन आध्यात्मिक साहाय्य केले आणि प्रेमाने आधार दिला. आज उच्च आध्यात्मिक अधिकार प्राप्त असतांनाही त्या साधकांशी तितक्याच जवळिकीने बोलतात आणि वागतात. त्यामुळे साधकांना त्यांचा मोठा आधार वाटतो.

श्री. योगेश जलतारे, समूह संपादक, सनातन प्रभात. (१९.११.२०२४)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.