देशाला सुरक्षित आणि विकसित कोण करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राजापूर येथील महायुतीची सार्वजनिक सभा !

लोकसभा निवडणूक – २०२४

राजापूर – ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशी ही निवडणूक नाही. ही लोकसभेची देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. देशाला सुरक्षित कोण ठेवू शकतो ? देशाला कोण विकसित करू शकतो ? याचा विचार करायला लावणारी ही निवडणूक आहे. आपल्यासमोर केवळ दोनच पर्याय आहेत. एकीकडे विश्वगौरव नरेंद्र मोदीजी आणि दुसरीकडे राहुल गांधी ! आपणच निवड करायची आहे. भारताच्या विकासासाठी कमळालाच मतदान करून स्वत:चाही विकास साधा, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. रत्नागिरी-राजापूर मतदारसंघातील महायुतीचे नेते नारायण राणे यांच्या प्रचारासाठी शहरातील वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणात ही सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, महायुतीचे उमेदवार मंत्री नारायण राणे यांनीही सभेला संबोधित केले.

सौजन्य:आपला सिंधुदुर्ग

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की,

१. आपली महायुती आहे, तर दुसरीकडे २६ पक्षांची खिचडी आहे. आपल्याकडे मोदीजींचे शक्तीदायी इंजिन आहे. आपली सातत्याने पुढे जाणारी विकासाची गाडी आहे. तिकडे मात्र प्रत्येकजण म्हणतोय मीच इंजिन आहे. तिकडे डबे नाहीत. शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळेंना जागा आहे. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनिया गांधी आणि प्रियांका यांना जागा आहे. तुम्हाला जागा नाही. मोदींच्या गाडीमध्ये मात्र सर्वस्तरातील सर्वसामान्य जनतेला बसायला जागा आहे. मंत्री नारायण राणे हे कोकण विकासाची बोगी पंतप्रधान मोदींच्या इंजीनला जोडतील आणि विकास साधतील.

२. कोविडच्या काळात जगात ३ ते ४ देशांकडे लस होती. मोदीजींनी स्वतः पुढाकार घेऊन देशात लस तयार केली. मोदीजींना आशिर्वाद देण्याची हीच वेळ आहेत.

३. मागील १० वर्षांत मोदींनी देश बदलला. शुद्ध पाणी, गॅस, शौचालय, आरोग्य सुविधा, मुद्रा लोन, महिला सक्षमीकरण यावर काम केले. समाजातील प्रत्येक घटकाला घेऊन मोदी पुढे जात आहेत.

४. येणार्‍या काळात २० लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज तरुणांना देण्याचा निर्णय मोदीजींनी घेतला आहे. वर्ष २०२६ नंतर हा अर्धा मंच महिलांचा असेल. समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन मोदीजी पुढे चालले आहेत.

५. वर्ष २०१९ नंतर अडीच वर्ष महाराष्ट्राने वसुली सरकार पाहिले; पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाला प्रारंभ झाला आहे. लोकांचे विचार आता बदलत आहेत सरकार मजबूत आहे; कारण केंद्राचे पाठबळ आहे. याच केंद्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली राणे मंत्री आहेत. मोठी गुंतवणूक उद्योगाच्या माध्यमातून आली आहे.

६. नारायण राणे साहेबांच्या डोळ्यांसमोर नेहमी कोकण असते. खासदार म्हणून निवडून गेल्यावर मोठी गुंतवणूक ते कोकणात आणतील आणि कोकणची अर्थव्यवस्था पूर्णतः बदलून टाकतील.