शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल गौरव !

‘गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ’ यांच्या वतीने ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांना मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान

चिपळूण – भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळ पेढे-परशुराम तालुका चिपळूणचे विद्यमान अध्यक्ष आणि श्री संस्थान भार्गवराम परशुराम देवस्थानचे विश्वस्त  ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाविषयी नेपाळ येथील ‘गांधी पीस फाऊंडेशन’ आणि कर्तव्यदक्ष फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मान केला.

२० एप्रिल २०२४ या दिवशी पिंपरी चिंचवड पुणे येथे ग.दि. माडगूळकर सभागृहात हा सोहळा पार पडला. या वेळी ‘गांधी पीस फाऊंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष डॉ. लालबहादूर राणा, पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री विजय कुमार शहा, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अधिवक्ता डॉ मंगेश नेने, ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. आशा पाटील, बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. महेंद्र देशपांडे,  गांधी पीस फाऊंडेशनचे भारत प्रभारी डॉ. सुनीलसिंह परदेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

वर्ष २००९ मध्ये ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांची संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर संस्थेचे शैक्षणिक कार्य गतीमान झाले. चिपळूण आणि खेड तालुक्यांतील २ सहस्र विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. अभय महाराज यांचे नियोजन, संगोपन आणि मार्गदर्शन यांमुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत आहे. या पदवीदान सोहोळ्याचे आयोजन कर्तव्यदक्ष फाऊंडेशनचे डॉ. वीरेंद्र टिळे आणि डॉ. राजेंद्र आहेर यांनी केले.