Modi Deity Election : पंतप्रधान मोदी यांनी देवतांच्या नावावर मते मागितल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घाला !

देहली उच्च न्यायालयात याचिका

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याच्या आरोपावर येत्या २९ एप्रिलला देहली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. अधिवक्ता आनंद एस्. जोंधळे  यांनी हा आरोप करत या संदर्भात याचिका प्रविष्ट (दाखल) करून पंतप्रधान मोदी यांना ६ वर्षांसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

या याचिकेत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी देव आणि मंदिर यांच्या नावावर लोकांकडून मते मागत आहेत. पंतप्रधानांनी ९ एप्रिलला उत्तरप्रदेशातील पिलीभीत येथे केलेल्या भाषणात हिंदु देवता, शीख देवता आणि त्यांची प्रार्थनास्थळे यांच्या नावाने मते मागितली. मोदी यांनी ‘श्रीराममंदिर बांधले, करतारपूर साहिब कॉरिडॉर विकसित केला, गुरुद्वारांमध्ये लंगरमध्ये वापरल्या जाणार्‍या वस्तूंवरील जीएस्टी काढून टाकला, अफगाणिस्तानातून गुरू ग्रंथसाहिबच्या प्रती परत मागवल्या, अशी कामे केल्याचा उल्लेख केला होता.