Pakistan On Bangladesh Progress : बांगलादेश पाकिस्ताच्या पुढे गेलेला पाहून स्वतःचीच लाज वाटते ! – शाहबाज शरीफ

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विधान !

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सिंध सीएम हाऊसमध्ये उद्योगपतींना संबोधित करतांना म्हटले की, बांगलादेशाची प्रगती पाहून मला स्वतःची लाज वाटते.

१. वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तानपासून वेगळे होऊन बांगलादेशाची निर्मिती झाली. ५३ वर्षांत बांगलादेश दक्षिण आशियातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. बांगलादेशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ३७ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था सतत ढासळत आहे. त्याचा जीडीपी २ लाख कोटी रुपये आहे. बांगलादेशाचा एक टका (तेथील चलन) पाकिस्तानच्या दोन रुपयांइतका आहे.

२. वर्ष २०१६ मध्ये प्रथमच बांगलादेशाने जीडीपीच्या बाबतीत पाकिस्तानला मागे टाकले होते. त्या वेळी बांगलादेशाचे दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन १ लाख ३८ सहस्र रुपये होते, तर पाकिस्तानचे दरडोई सकल देशांतर्गत उत्पादन १ लाख २२ सहस्र रुपये होते.
आता पाकिस्तानचा दरडोई जीडीपी समान राहिला; परंतु बांगलादेशाचा दरडोई जीडीपी २ लाख रुपयांच्या पुढे गेला आहे.

३. वर्ष १९७२ मध्ये ७ बांगलादेशी टका १ अमेरिकी डॉलरच्या बरोबरीचे होते, तर ४ पाकिस्तानी रुपये १ डॉलरच्या बरोबरीचे होते; पण आज १ डॉलरची किंमत १०९ टका आणि २७८ पाकिस्तानी रुपये आहे.

संपादकीय भूमिका

जनाची आणि मनाची लाज न वाटणार्‍या पाकिस्तान्यांना लाज वाटते, हेही नसे थोडके ! ज्या बांगालादेशी लोकांवर पाकने अत्याचार केले, २५ लाख बांगलादेशी हिंदु आणि मुसलमान नागरिकांची हत्या केली तो बांगलादेश आर्थिक क्षेत्रात पाकच्या पुढे गेला, तर पाक दिवाळखोरीकडे पोचला आहे, ही त्याला मिळलेली शिक्षाच होय !