सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे !

विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. दादा वेदक यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट

श्री. दादा वेदक यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. योगेश जलतारे (डावीकडे)

रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे कार्य हे हिंदु धर्माच्या पुनरुत्थानाचे कार्य आहे. हिंदु, हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्र यांना पुन:प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे, तसेच पुनश्‍च प्राणप्रीय भारतमातेला जगाच्या कल्याणासाठी जगाच्या गुरुस्थानावर पुनर्स्थापित करण्याचे हे कार्य आहे, असे मत विश्‍व हिंदु परिषदेचे अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख श्री. महेंद्र उपाख्य दादा वेदक यांनी व्यक्त केले. २५ एप्रिल २०२४ या दिवशी त्यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. सनातनच्या आश्रमातील कार्य पाहून अभिप्राय व्यक्त करतांना त्यांनी उपरोक्त मत मांडले. या वेळी त्यांच्यासमवेत विश्‍व हिंदु परिषदेच्या फोंडा (गोवा) कार्यालयाचे समन्वयक श्री. लक्ष्मण हे उपस्थित होते. सनातनचे साधक श्री. निषाद देशमुख यांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि हिंदु धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. योगेश जलतारे यांनी श्री. वेदक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, तसेच सनातनचे ग्रंथ भेट देऊन सत्कार केला.

आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली ! – श्री. दादा वेदक

श्री. दादा वेदक पुढे म्हणाले की, आश्रमात पाय ठेवताच सकारात्मक ऊर्जा जाणवली. आश्रमातील स्वच्छता आणि सेवाभाव कौतुकास्पद आहे. आश्रमात आनंद जाणवला. सेवा, साधना, समर्पण, त्याग इत्यादी गुण आणि गुरूंवर असलेली अपार श्रद्धा यांच्या बळावर साधक कार्यरत आहेत.

‘साधकांना चांगले आरोग्य लाभो, हे कार्य असेच वृद्धींगत होवो आणि त्यांना विविध प्रकारच्या लक्ष्मींची प्राप्ती होवो’, यासाठी श्री. वेदक यांनी ईश्‍वरचरणी प्रार्थना केली.