ईश्वर आणि गुरु यांच्यावर दृढ श्रद्धा असणार्‍या फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७२ वर्षे) !

‘माझी आई श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी (वय ७२ वर्षे) हिच्या अंगी भगवंताच्या कृपेने अनेक कलागुण असून ती प्रत्येक कृती साधना म्हणून करते. ती प्रत्येक कृती करतांना देवाशी अनुसंधान ठेवण्याचा, तसेच स्पंदनांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगातही ती केवळ देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावरच स्थिर राहू शकली. मला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्रीमती अंजली अनंत कुलकर्णी

१. स्वावलंबी

आई स्वावलंबी आहे. ती कुठल्याही कारणासाठी कधी कुणावर अवलंबून रहात नाही. तिच्या कुणाकडून काही अपेक्षाही नसतात.

२. समाधानी

आईचे स्वतःच्या मनावर पूर्ण नियंत्रण आहे. एखादा पदार्थ आवडीचा आहे; म्हणून ती कधी अधिक प्रमाणात खात नाही. तिला कुठलीही वस्तू, दागदागिने किंवा कपडेलत्ते यांविषयीही कसलीच आसक्ती नाही. तिच्याकडे जे आहे, त्यात ती समाधानी असते. तिला काही मिळाले; म्हणून ती हुरळून जात नाही किंवा काही नसेल, तर त्याविषयी दुःखही करत नाही.

३. प्रेमळ

अश्विनी कुलकर्णी

आईने नेहमी सर्वांची मनापासून सेवा केली. माझी आजी (वडिलांची आई) कर्करोगाने रुग्णाईत असतांना आईने तिची पुष्कळ सेवा केली. तिने आजीचे पथ्य-पाणी सांभाळले आणि माझ्या आजोबांची सेवाही मनापासून केली. माझ्या काकांना हृदयविकाराचा झटका आला. तेव्हा आईने काकांचीही पुष्कळ सेवा केली. काकांना अंथरुणातून उठता येत नव्हते. तेव्हा ती त्यांना जेवणही भरवायची. ती सर्वांच्या आवडी-निवडी ध्यानात ठेवते आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार सर्व करते.

४. स्वयंशिस्त आणि वक्तशीरपणा

अ. माझ्या लहानपणापासून ते आजपर्यंत आईचा दिनक्रम कधीही चुकलेला नाही. कुठलाही सण-उत्सव असो किंवा कुणाचा श्राद्धविधी असो, ती सर्व सिद्धता आधीच करून ठेवते. ती प्रत्येक कृती करतांना वेळेचे नियोजन करते आणि त्याचे पालनही करते. ती तिची शिस्तबद्धता सोडत नाही कि त्यात कुठलीही सवलत घेत नाही.

आ. तिच्या नामजप करणे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय करणे किंवा स्तोत्रे ऐकणे, या कृतीही नियोजनबद्ध आणि त्या-त्या वेळेतच असतात. काही दिवस ती रुग्णाईत असतांना तिला ४ – ५ घंटे नामजपादी उपाय असायचे. तेव्हा ती नियोजन करून ते उपाय पूर्ण करायची.

इ. तिच्याकडे काही सेवा असेल, तर ती वेळेचे नियोजन करून सेवा पूर्ण करते. सेवा नसेल, तर ती वेळ वाया घालवत नाही. ती ग्रंथांचे वाचन करते.

५. नीटनेटकेपणा आणि व्यवस्थितपणा

आई सर्व कृती करतांना त्या नीटनेटकेपणाने आणि व्यवस्थित करते. तिचे रहाणीमानही अत्यंत नीटनेटके असते. तिने घडी करून ठेवलेल्या साड्यांना क्वचितच इस्त्री करावी लागते.

(क्रमश:)

– अश्विनी अनंत कुलकर्णी (श्रीमती अंजली कुलकर्णी यांची मुलगी), फोंडा, गोवा. (५.९.२०२१)


पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/787921.html