Maldives President China Agenda : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष आता राज्यघटनाच पालटणार !

३० नवीन बेटांवरील बांधकांमांचे कंत्राट चिनी आस्थापनांना मिळणार !

मालदीवचे राष्ट्रपती महंमद मुइज्जू

माले (मालदीव) – मालदीवच्या संसदीय निवडणुकीत भारतविरोधी राष्ट्राध्यक्ष महंमद मुइज्जू यांना बहुमत मिळाल्यानंतर आता ते राज्यघटना पालटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. याद्वारे ते मालदीवच्या ३० बेटांवर चिनी आस्थापनांना बांधकामासाठी कंत्राटे देणार आहेत. येथे चिनी आस्थापने पहिल्या टप्प्यात एक सहस्र सदनिका बांधणार आहेत. समुद्रावर पूल बांधून ही ३० नवीन बेटे निर्माण करण्यात आली आहेत.

मालदीवचे माजी भारत समर्थक राष्ट्राध्यक्ष महंमद नशीद हे नवीन बेटांवर बांधकाम करण्याच्या विरोधात होते. पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे मालदीव हा जगातील पहिले पर्यावरण निर्वासित देश होऊ शकतो, अशी चेतावणी त्यांनी दिली होती.

इस्लामी रोख्यांद्वारे ४ सहस्र २०० कोटी रुपये उभारणार

मालदीववर ५४ सहस्र १८६ कोटी रुपयांचे विदेशी कर्ज आहे. जागतिक बँकेनुसार, वर्ष २०२६ पर्यंत मालदीवला अनुमाने ९ सहस्र कोटी रुपयांचे विदेशी कर्ज फेडावे लागणार आहे. यासाठी अध्यक्ष मुइज्जू यांनी इस्लामी रोख्यांद्वारे ४ सहस्र २०० कोटी रुपये उभारण्याची योजना आखली आहे. त्यासाठी तुर्कीये आणि सौदी अरेबिया यांच्याकडून इस्लामी रोखे खरेदी केले जाणार आहेत.

संपादकीय भूमिका

नखाएवढा मालदीव भारताच्या विरोधात सातत्याने दंड थोपटत आहे. ही त्याच्या आत्मघाताची लक्षणे आहेत, याची जाणीव भारताने त्याला करून देण्याची आवश्यकता आहे, अन्यथा भारताला त्याचा तोटा सहन करावा लागेल !