टाटा सामाजिक संस्थेतील विद्यार्थ्याने देशद्रोह केल्याचे उघड
श्रीराममंदिराच्या विरोधातील लघुपट दाखवण्याची पोस्ट, बंदी असलेली पंतप्रधानांवरील चित्रफीत दाखवणे आणि अन्य देशद्रोही कृत्ये केल्याचा आरोप
मुंबई – टाटा सामाजिक संस्थेने (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स – टीस) पीएच्.डी. (विद्यावाचस्पती) करणार्या रामदास प्रिनी शिवानंदन या विद्यार्थ्यावर देशविरोधी कारवाया केल्याबद्दल दोन वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली. त्यांच्याच संस्थेची विद्यार्थी संघटना असलेल्या प्रोग्रेसिव्ह स्टुडंट फोरमच्या (पी.एस्.एफ्.) बॅनरखाली जानेवारी २०२४ मध्ये देहलीत संसदेबाहेर त्याने केलेल्या आंदोलनात ‘टीस’च्या नावाचा दुरुपयोग केल्याचे संस्थेने म्हटले आहे.
मूळचा केरळ येथील असलेल्या रामदास या विद्यार्थ्याने ‘राम के नाम’ ही डॉक्युमेंट्री दाखवण्यासंबंधी सामाजिक माध्यमावर २४ जानेवारी २०२४ या दिवशी पोस्ट टाकली होती. हे कृत्य अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनाचा अपमान आणि त्याविरोधात आंदोलन करणारे होते. देशात बंदी असलेल्या बीबीसीच्या लघुपटाचे प्रक्षेपण ‘टीस’च्या परिसरात २८ जानेवारीला करणे, वादग्रस्त वक्त्यांना बोलावून ‘भगतसिंग मेमोरियल लेक्चर’ घेणे, संस्थेच्या संचालकांच्या घराबाहेर घोषणाबाजी करणे ही अनधिकृत कृत्ये रामदासने केली असून यासाठी त्याला वारंवार लेखी नोटीस देऊन संस्थेने चेतावणी दिली होती.
रामदासने केलेले कृत्य हे देशविरोधी असून त्यातून संस्थेची अपकीर्ती होत आहे. टीससारखी सार्वजनिक संस्था हे खपवून घेणार नाही. हे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे संस्थेने त्याला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
‘टीस संस्था विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. एका गरीब कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यासाठी या संस्थेला भाजप सरकारचा पाठिंबा आहे’, असा आरोप पी.एस्.एफ्.या विद्यार्थी संघटनेने केला आहे.
‘एका दलित स्कॉलरला जाणीवपूर्वक लक्ष्य करून ही कारवाई करण्यात आली. विद्यार्थी हक्काची मागणी करणे किंवा सत्ताधारी भाजपवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे देशविरोधी कृत्य नव्हे’, असे म्हणत ‘महाराष्ट्र राज्य समिती’ने (एस्.एफ्.आय.ने) रामदासचे निलंबन मागे घेण्याची मागणी केली आहे. रामदास याला मुंबई, तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी येथील संस्थेच्या परिसरात प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका :‘टीस’ने ही कारवाई केली, ते योग्यच झाले; परंतु सध्या देशातील वातावरण पाहून संस्थेने स्वतःचा बचाव करण्यासाठी तर ही कारवाई केली नाही ना ? असे कुणालाही वाटू शकते. संस्थेतील एकूणच पुरोगामी वातावरण पालटण्यासाठी प्रयत्न झाले, तरच या कारवाईला अर्थ राहील ! |