‘१०.९.२०२३ या दिवशी सोलापूर सेवाकेंद्रात साधना करणारे श्री. सुनील भोवर यांचा ‘महारथी शांती’ विधी (वयाच्या ६५ व्या वर्षी करायचा विधी) कुडाळ येथे झाला. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. सौ. स्नेहा भोवर (श्री. सुनील भोवर यांच्या पत्नी), सोलापूर सेवाकेंद्र
अ. ‘मला यज्ञाच्या ज्वाळांत ॐ उमटलेले दिसले.
आ. ‘सोहळा वैकुंठातच होत आहे’, असे मला जाणवले.
इ. ‘हा सोहळा म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव सोहळा आहे’, असे माझ्या भाच्याला (श्री. दीपक पाटील यांना) वाटले.’
२. श्री. संकेत भोवर (श्री. सुनील भोवर यांचा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. सोहळ्यासाठी लागणारे साहित्य बाहेरून आणण्याची सेवा गुरुदेवांच्या कृपेने शांतपणे होणे : ‘माझ्याकडे या विधीसाठी लागणारे साहित्य बाहेरून आणण्याची सेवा होती. त्यासाठी मला सतत बाहेर जावे लागत असे. एरव्ही अशा वेळी माझी नेहमी चिडचिड होते; मात्र सोहळ्यासाठी लागणार्या वस्तू मी शांतपणे आणल्या. मला वाटले, ‘ गुरुदेवांनीच माझ्याकडून ही सेवा करून घेतली.’
२ आ. ‘वडिलांची पाद्यपूजा करतांना गुरुदेवांची पाद्यपूजा करत आहे’, असे जाणवणे आणि भावजागृती होणे : ‘मला बाबांची पाद्यपूजा करायची आहे’, असे समजल्यावर माझ्या मनात आरंभी प्रतिमा जपण्याचे विचार आले. माझ्या मनात आले, ‘मी सर्व नातेवाइकांच्या समोर पाद्यपूजा कशी करणार ?’ मी पाद्यपूजा करायला आरंभ केल्यावर मला जाणवले, ‘माझ्यासमोर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) बसले आहेत आणि बाबांचे पाय गुरुदेवांचेच चरण आहेत. बाबांना हार घालतांना गुरुदेवांना हार घालत आहे.’ या वेळी माझी भावजागृती झाली. माझ्या मनातील प्रतिमा जपण्याचे विचार आपोआप नाहीसे झाले आणि मी विधीचा लाभ घेऊ शकलो.
२ इ. यज्ञातून निघणार्या धुराचा माझ्या डोळ्यांना त्रास झाला नाही.
गुरुदेवांनी आम्हा सर्वांना दैवी सोहळा अनुभवयाला दिल्याबद्दल मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
३. कु. वैभवी भोवर (मुलगी, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय २६ वर्षे), ठाणे सेवाकेंद्र
३ अ. ‘सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होत आहे’, असे वाटणे आणि सोहळ्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले अन् श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवणे : ‘आम्ही प्रथमच एवढा मोठा सोहळा करणार होतो. ‘गुरुदेव सर्व सुचवत आहेत आणि साहाय्य करत आहेत’, असे मला सतत जाणवत होते. ‘हा सोहळा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होत आहे’, असे मला जाणवले. सोहळ्याच्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे अस्तित्व जाणवले.
३ आ. आई-बाबा विधी करत असतांना मला त्यांच्या चेहर्यात पुष्कळ पालट जाणवत होता. नातेवाईकही विधी आणि पूजन एकाग्रतेने ऐकत अन् पहात होते.
३ इ. आई-वडिलांच्या त्यागाविषयीचे मनात विचार येऊन भावजागृती होणे : आई-बाबांची पाद्यपूजा मला आणि दादाला करायची होती. तेव्हा ‘आई-बाबांनी साधनेसाठी केलेला त्याग, ‘आमची साधना व्हावी’, यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, हे आठवून माझी भावजागृती झाली. माझ्या मनात मायेचे विचार न येता मला सर्व आध्यात्मिक स्तरावर अनुभवता येत होते.
३ ई. साधकांनी सोहळ्यात पौरोहित्य आणि चित्रीकरण केले. सोहळ्याच्या ठिकाणी साधकांनी ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावले होते. आम्ही नातेवाइकांना ग्रंथ आणि नामपट्ट्या भेट दिल्या.
३ उ. सोहळा झाल्याच्या दिवशी रात्री सद्गुरु सत्यवान कदम आणि काही साधक घरी आले होते. तेव्हा ‘गुरुदेवांनी आम्हाला साधक कुटुंब दिले आणि आम्हाला या कुटुंबाचा एक भाग बनवला आहे’, याबद्दल मला कृतज्ञता वाटत होती.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
गुरुदेवांनीच सर्व करून घेतले. त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. ‘गुरुदेवा, आपल्याला अपेक्षित अशी साधना आणि सेवा करण्यासाठी आमचा प्रत्येक क्षण अन् श्वास अर्पण करून घ्या आणि आम्हाला आपल्या चरणांचे सेवक बनवा’, अशी मी आपल्या चरणी याचना करते.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १८.१०.२०२३)
|