पुणे – खरीप हंगामात शेतकर्यांना बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील, यांवर लक्ष केंद्रित करावे. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नये, यासाठीही प्रयत्नशील रहावे. बोगस बियाणे आणि खते निदर्शनास आल्यास तातडीने गुन्हे नोंद करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या. जिल्हा खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. कीटकनाशकांच्या संदर्भात तक्रार आल्यास लगेच पडताळणी करून अहवाल सिद्ध करावा. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण करून नैसर्गिक शेतीला चालना मिळावी, म्हणून प्रयत्न करावेत. खतांच्या वाहतुकीच्या संदर्भात योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या. याव्यतिरिक्त सोयाबीन लागवडीला चालना मिळावी, शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा, पडीक भूमीवर बांबू लागवडीचा उपक्रम राबवावा, खतांच्या आस्थापनांनी विभागाच्या सूचनेनुसार आवश्यक तेथे खतांचा पुरवठा करावा, असेही ते म्हणाले.