मुसलमान कायद्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात ! – इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल
(ग्रीन इस्लाम म्हणजे पर्यावरणाविषयी जागरूक असलेला इस्लाम)
(इमाम म्हणजे मशिदीमध्ये प्रार्थना करून घेणारा)
जकार्ता (इंडोनेशिया) – सर्वाधिक मुसलमान लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियात सध्या ‘ग्रीन इस्लाम’ ही चळवळ चालू झाली आहे. ग्रीन इस्लामचा अर्थ ‘पर्यावरणाविषयी जागरूक असलेला इस्लाम’, असा आहे. नसरुद्दीन उमर हे राजधानी जकार्ता येथील इस्तिकलाल मशिदीचे मुख्य इमाम आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ चालू झाली आहे. त्यांच्या भाषणांमध्ये पर्यावरण हा प्रमुख विषय असतो. यासंदर्भात ‘इंडोनेशियन उलेमा काऊन्सिल’चे पर्यावरण संरक्षण प्रमुख हायु प्रबोवो म्हणाले की, (मुसलमान) लोक कायदे पाळणार नाहीत. त्यांना त्याची पर्वा नाही; परंतु ते धार्मिक नेत्यांचे ऐकतात; कारण त्यांचे धार्मिक नेते म्हणतात की, तुम्ही कायद्यांपासून वाचू शकता. तथापि अल्लाने बनवलेल्या कायद्यांपासून नाही. नसरुद्दीन उमर यांच्या या प्रयत्नांची नोंद आंतरराष्ट्रीय समुदायानेही घेतली आहे.
उमर अनेकदा चेतावणी देतात की, मानव म्हणून आपला सर्वांत धोकादायक दोष हा आहे की, आपण पृथ्वीला केवळ एक वस्तू मानतो. आपण जितके लोभी असू, तितक्या लवकर जगाचा शेवट होईल. ज्याप्रमाणे मुसलमान रमझानमध्ये उपवास करतात, त्याचप्रमाणे त्यांनी पृथ्वीचे रक्षण करणेही त्यांचे कर्तव्य मानले पाहिजे. प्रतिदिनच्या नमाजाप्रमाणे झाडे लावण्याचीही सवय झाली पाहिजे. ‘मुसलमानांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे’, या प्रेषित महंमद यांच्या सूचनांचे पालन केले पाहिजे.