विदेशी भाषा निवडण्याचा पर्याय वगळला जाण्याची शक्यता !
पणजी, १८ एप्रिल (वार्ता.) : सरकार आगामी शैक्षणिक वर्षापासून (वर्ष २०२४-३५) ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण -२०२०’ ९ वी इयत्तेसाठी लागू करण्याची शक्यता आहे. यामुळे विदेशी भाषा निवडण्याचा पर्याय वगळण्यासमवेतच शिक्षणात मोठा पालट होण्याची शक्यता आहे.
प्राप्त माहितीनुसार शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकार्यांनी नुकतीच मुख्याध्यापकांची एक बैठक घेतली. यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देण्यासमवेतच शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचा कोणताही प्रश्न सोडवण्याचे आश्वासनही देण्यात आले. नवीन धोरणामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण बराच प्रमाणात घटण्याची शक्यता आहे; मात्र धोरणाचा शिक्षणाच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होणार नाही. नवीन धोरणानुसार वर्गाचा कालावधी ४५ मिनिटांऐवजी १ घंटा असणार आहे. सध्या तिसरी भाषा म्हणून विदेशी भाषा घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे; मात्र नवीन धोरणानुसार हा पर्याय असणार नाही. नवीन धोरणानुसार पहिली भाषा इंग्रजी, तसेच दुसरी आणि तिसरी भाषा ही भारतीय भाषा असणे सक्तीचे असेल. सरकारने गत शैक्षणिक वर्षापासून ‘फाऊंडेशन कोर्स’मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले आहे. वर्ष २०२७-२८ पर्यंत ‘फाऊंडेशन कोर्स’ अंतर्गत सर्व स्तरांवरील वर्ग राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत येणार आहेत, तसेच वर्ष २०२५-२६ पासून इयत्ता ३ री ते इयत्ता ५ वीपर्यंत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. वर्ष २०२७ -२९ पर्यंत इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वीपर्यंत सर्वच स्तरांवर ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होईल.