मुंबईमध्ये प्रतिवर्षी मुसळधार पावसामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली जातात, असे दिसून येत असते. अशी समस्या येऊ नये; म्हणून अनेक वर्षे महापालिका प्रयत्न करत आहे; मात्र शहरातील काही जागा अशा आहेत की, तेथे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांची भौगोलिक स्थितीच अशी आहे की, तेथे पाणी न साचण्यासाठी काहीही करता येणे शक्य नाही. मुंबई ७ बेटांना एकत्र करून बनवण्यात आलेले शहर आहे. येथे पूर्वी खाडी होती आणि ती मातीचा भराव टाकून एकत्र जोडण्यात आली. त्यामुळे अनेक भाग हे सखल आहेत आणि पावसाळ्यात तेथे पाणी भरतेच; मात्र जगातील एक सुनियोजित आणि अत्याधुनिक दुबई शहर असे नाही. असे असले, तरी १६ एप्रिल या दिवशी तेथे झालेल्या प्रचंड पावसामुळे दुबई पाण्यामध्ये बुडाल्याचे दृश्य संपूर्ण जगाने पाहिले. मुंबईत कधी विमानतळावर पूरसदृश्य स्थिती येत नाही; मात्र दुबईच्या विमानतळावर, धावपट्टीवर काही फूट पाणी भरले होते. रेल्वे, मेट्रो आणि रस्ते हे सर्व पाण्याने भरले होते. यामुळे प्रशासनाने शाळा बंद करण्यास सांगितले. दुबई येथे कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडल्याने ही स्थिती निर्माण झाली. थोडक्यात निसर्गाच्या विरुद्ध जाऊन कृती केल्यामुळे तेथे ओढवलेली ही आपत्ती होती. मुंबईची तुलना दुबईच्या विकासाशी आणि श्रीमंतीशी केली जाऊ शकत नाही; मात्र ज्या पद्धतीने पाऊस पडला आणि दुबईची स्थिती झाली, ते पहाता ‘आमची मुंबई कितीतरी चांगली’ असेच मुंबईकरांच्या मनात विचार आले असणार, यात शंका नाही. ‘निसर्गाच्या पुढे सर्व अत्याधुनिक आणि प्रगत म्हटले जाणारे ज्ञान किती अपुरे आहे’, हे लक्षात येते.
दुबईतच नव्हे, तर न्यूयॉर्क शहरही यापूर्वी मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याचे जगाने पाहिले होते. ‘दुबईत असे काही तरी घडेल आणि अशी आपत्ती ओढवेल ?’, याची कल्पना त्या शहराची रचना करणार्यालाही ठाऊक नसेल. आताही दुबईमधील पावसामुळे झालेल्या स्थितीवर तेथे अभ्यास केला जाईल आणि अशा प्रकारचा पाऊस पडला, तर पुन्हा अशी स्थिती येणार नाही, यावर उपाययोजना काढल्या जातील; मात्र ते प्रत्यक्षात किती प्रमाणात करता येईल ? हेही पहावे लागेल. जेव्हा गगनचुंबी इमारती, तसेच मोठ मोठे पूल, रेल्वे अन् मेट्रो यांचे जाळे निर्माण केलेले असते, तेव्हा रचनेत पालट करणे कठीण जाते, हे मुंबईच्या अनुभवावरून लक्षात येते. मुंबईची मलनिस्सारण यंत्रणा ब्रिटिशांच्या काळापासून आहे. त्यात पालट करण्याचा प्रयत्न विविध बांधकामांमुळे कठीण आहे, हे प्रशासनाला लक्षात आले आहे. त्यामुळे परिस्थिती पालटण्यापेक्षा तिला सामोरे जाऊन उपाय काढण्याचा प्रयत्न प्रतिवर्षी केला जातो, तसाच प्रयत्न दुबईलाही करावा लागणार, असेच दिसून येते.
विनाश अटळ
सौदी अरेबियामध्ये गेल्या काही वर्षांत निसर्गात मोठे पालट होत असतांना दिसत आहेत. हे पालट म्हणजे जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे होत असलेल्या जलवायू परिवर्तनाचा परिणाम आहे. सौदीमध्ये पुरासमवेत बर्फवृष्टी झाल्याचे यापूर्वी पहायला मिळाले आहे. आताही केवळ दुबईच नव्हे, तर शारजा, अबू धाबी येथेही मुसळधार पाऊस पडला. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्या सीमेवर पूरस्थिती निर्माण होऊन अनेक लोकांचा मृत्यू झाला. वाळवंटाच्या ठिकाणी असे कधीतरी घडेल, असा कुणी स्वप्नातही विचार केला नसेल. वाळवंटात ही स्थिती असतांना युरोपमध्ये गेल्या काही वर्षांत उष्णतेची लाट येत आहे. तेथे वाळवंटासारखा उन्हाळा सहन करावा लागत आहे. भारतातही मागच्या हिवाळ्यात काश्मीरमध्ये बर्फवृष्टी विलंबाने झाली. असे यापूर्वी कधी घडले नव्हते. जलवायू परिवर्तनावर उपाययोजना काढण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर प्रयत्न होत आहेत; मात्र त्याला यश मिळण्याऐवजी दिवसेंदिवस परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे आणि ‘तिच्यावर मात करण्यासाठी काय करायला हवे ?’, हे ठाऊक असतांना ते करणे सामाजिक अन् आर्थिक स्थिती पहाता अशक्य आहे. कोरोना महामारीच्या काळात जगभरातील सर्व वाहतूक आणि आस्थापने ठप्प होती. त्या वेळी वायू आणि जल प्रदूषण यांची टक्केवारी अत्यंत अल्प झाली. भारतातील प्रदूषित यमुना नदी स्वच्छ दिसू लागली, तर इटलीतील लहान लहान जलमार्गांत पुन्हा मासे दिसू लागले होते. म्हणजेच वाहतूक आणि आस्थापने यांच्याकडून होणारे प्रदूषण या स्थितीला एक कारण आहे, हे स्पष्टपणे दिसून आले. जर वाहतूक आणि आस्थापने कायमस्वरूपी बंद केली, तर आणि तरच निसर्गाचा कोप वाचवता येऊ शकतो, अन्यथा विनाश अटळ आहे; मात्र असे करणे जवळपास अशक्यच आहे.
धर्माचरण आवश्यक !
प्राचीन काळी पाण्याच्या सुविधेमुळे नदीच्या किनारी लोकांचे वास्तव्य असायचे; मात्र जर याच नदीला पूर आला, तर लोकांना विस्थापित व्हावे लागायचे. विस्थापित होण्याची संधी मिळाली नाही, तर मृत्यू अटळ असायचा. अनेक संस्कृती अशाच नष्ट झाल्या आहेत, असे म्हटले जाते. सिंधु नदीच्या किनारीही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने तेथील प्राचीन संस्कृती नष्ट झाली. केवळ पाणीच नव्हे, तर भूकंपांमुळेही संस्कृती नष्ट झाल्या आहेत. निसर्गाच्या नियमांचे उल्लंघन करून केलेल्या कृती नंतर विनाशाला कारणीभूत ठरतात, याचा धडा घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. लयाला पंचमहाभूते कारण ठरू शकतात. याचा विचार करून त्यांना शरण जाणे आवश्यक आहे. निसर्ग धर्माच्या अधीन असतो, असे म्हटले जाते. जर अनीती, दुराचार, अधर्माचरण होत असेल, तर निसर्गाचा कोप होतो. जर धर्माचरण होत असेल, तर निसर्ग अनुरूप होतो. आज निसर्गाचा जो काही समतोल बिघडला आहे, त्याला आध्यात्मिक स्तरावर अधर्माचरण कारणीभूत आहे. धर्म आणि अधर्म यांची व्याख्या पंथांच्या दृष्टीने करता येणार नाही. धर्म म्हणजे योग्य विचार आणि योग्य कृती या दृष्टीने पहाणे आवश्यक आहे. शासनकर्ता धर्माचरणी असेल, तर राज्यात सुख-समृद्धी नांदते आणि निसर्गही अनुकूल असतो; कारण धर्माचरणी राजा असेल, तर प्रजाही तशी असते. जर राजा अधर्माचरणी असेल, तर प्रजाही तशी होते आणि सर्वत्र अनाचार बळावतो अन् त्याचे परिणाम भोगावे लागतातच. त्यामुळे भारताचा विचार केला, तर बहुसंख्य हिंदूंनी धर्माचरण करणे आवश्यक ठरते, ज्यामुळे निसर्ग पूरक होईल.
निसर्ग पूरक होण्यासाठी धर्माचरण करणे आणि धर्माचरणासाठी साधना करणे आवश्यक ठरते ! |