Chhattisgarh Naxalite Encounter : छत्तीसगडमध्ये एकूण २९ नक्षलवादी ठार

कांकेर (छत्तीसगड) – येथे १६ एप्रिलला रात्री उशिरापर्यंत झालेल्या चकमकीमध्ये एकूण २९ नक्षलवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षादलांना यश मिळाले. यात नक्षलवाद्यांच्या २ कमांडरांचाही समावेश आहे. त्यांच्यावर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत २ सैनिकही घायाळ झाले आहेत. छत्तीसगडमध्ये मागील १० वर्षांत नक्षलवाद्यांच्या विरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमांपैकी ही एक मोहीम होती. ‘सुरक्षादलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या मोहिमेत नक्षलवादी मोठ्या प्रमाणात ठार झाले आणि सैनिक हुतात्मा झाले नाहीत’, अशी ही पहिलीच मोहीम आहे, असेही सांगण्यात येत आहे.

१. नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम चालू असल्यामुळे ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा  आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये १२ महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या महिला नक्षलवाद्यांकडे घातक शस्त्रे होती. सुरक्षादलांनी नक्षलवाद्यांवर आक्रमण केल्यावर या महिला नक्षलवाद्यांनी पुरष नक्षलवाद्यांचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला.

३. नक्षलवादी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षादलांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर ही मोहीम हाती घेण्यात आली, असे सांगण्यात आले.

सौजन्य : India Today

संपादकीय भूमिका 

एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांना ठार मारणार्‍या सुरक्षादलांचे अभिनंदन. या नक्षलवाद्यांना आर्थिक आणि सामाजिक पाठबळ देणार्‍या शहरी नक्षलवाद्यांच्या विरोधातही सरकारने धडक मोहीम हाती घेतली, तर भारतातील नक्षलवाद लवकर संपुष्टात येईल, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !