Supreme Court Mob Lynching : जमावाकडून होणार्‍या हत्यांना धर्माशी जोडू नका ! – सर्वोच्च न्यायालय

कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा याचिकेत उल्लेख नसल्याने न्यायालयाने मुसलमान अधिवक्त्याला सुनावले !

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने जमावाकडून होणार्‍या अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तींच्या हत्येच्या प्रकरणावर प्रविष्ट (दाखल) करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करतांना अधिवक्ता सलीम पाशा यांना फटकारले. या याचिकेत उदयपूर येथील कपडे शिकवणारे कन्हैयालाल यांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला नव्हता. त्यावरून न्यायालयाने सलीम पाशा यांना फटकारतांना ‘अशा प्रकरणांमध्ये निवडक होऊ नका; कारण हे प्रकरण सर्व राज्यांशी संबंधित आहे. धर्माच्या आधारे अशा घटनांकडे पाहू नका’ असे म्हटले.

‘नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन’ या संस्थेकडून गेल्या वर्षी ही याचिका प्रविष्ट (दाखल) करण्यात आली आहे. जमावाकडून हत्या झालेल्यांच्या कुटुंबियांना हानी भरपाई देण्याची मागणी यात करण्यात आली आहे. न्यायालयाने जमावाकडून हत्यांच्या प्रकरणांमध्ये केलेल्या कारवाईवर ६ आठवड्यांच्या आत अनेक राज्यांकडून उत्तर मागवले आहे. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या संपल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे.