कोल्हापूर, १६ एप्रिल (वार्ता.) – भारतीय राज्यघटनेच्या कलम ४४ मध्ये राज्यघटनेच्या अंतर्गत समान नागरी कायद्याची मार्गदर्शक तत्त्वे म्हणून नोंद आहे. त्यामुळे भारतात समान नागरी कायदा येत नाही, तोवर महिलांना समान अधिकार मिळणार नाहीत. त्यामुळे सर्वाेच्च परंपरांचे पालन करत समान नागरी कायदा करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी दिली. ते कोल्हापूर येथे भाजपच्या ‘लोकसभा २०२४’च्या संकल्प पत्राच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रसंगी भाजप खासदार धनंजय महाडिक, भाजप कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय जाधव उपस्थित होते.
१. भारताच्या सांस्कृतिक वारशाचा विकास आणि भारतीय संस्कृतीच्या स्मारकाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यात देशात जी अनेक महत्त्वाची हस्तलिखिते आहेत, त्यांचे जतन केले जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अशी अनेक महत्त्वाची हस्तलिखिते त्यात संवर्धन केली जाणार आहेत.
२. जो भारत पूर्वी ४०० ते ४५० कोटी रुपयांची खेळणी आयात करत असे, तो भारत सध्या ६५० कोटी रुपयांची खेळणी निर्यात करतो, हे मोठे यश आहे.
‘पी.एम्.गती-शक्ती’च्या माध्यमातून कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार ! – धनंजय महाडिक, खासदार, भाजप
कोल्हापूर-वैभववाडी हा प्रकल्प ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचा असून कोकण रेल्वेला आर्थिक स्थैर्य नसल्याने ते एवढा मोठा व्यय उचलू शकत नाहीत. त्यासाठी केंद्रीय स्तरावर बैठक होऊन हा प्रकल्प ‘पी.एम्.गती-शक्ती’च्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी बैठक झाली आहे आणि त्या माध्यमातून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.
काँग्रेसने घटनादुरुस्ती करून सामान्य नागरिकांचा जगण्याचा अधिकार काढून घेतला ! – माधव भांडारी
भाजप घटनेत पालट करत आहे, असा आरोप सातत्याने काँग्रेस करते; मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ७३ वेळा घटना दुरुस्त्या या काँग्रेसने केल्या आहेत. यातील अनेक दुरुस्त्या या अशा आहेत की, त्या थेट घटनेच्या मूळ आशयालाच हात घालणार्या आहेत, मूळ उद्देश पालटणार्या आहेत. वर्ष १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जी घटनादुरुस्ती केली, ती सर्वसामान्य नागरिकांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याची, त्यांचे विचार-प्रचार स्वातंत्र्य काढून घेण्याच्या संदर्भात होती. इंदिरा गांधी यांनी घटनेच्या प्रस्तावनेत पालट करत त्यात ‘समाजवाद आणि सेक्युलर’ हे शब्द घुसडले ! त्या काळी सर्व विरोधकांना कारागृहात टाकण्यात आलेले असतांना हे पालट करण्यात आले. वास्तविक हा घटनेच्या आत्म्याशी इंदिरा गांधी यांनी केलेला खेळ होता. या संदर्भात काँग्रेससमवेत आम्ही कुठेही जाहीर चर्चा करण्यास सिद्ध आहोत.