अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचा प्रसाद गोव्यातील रामभक्तांना वाटतांना आलेली अनुभूती

१. अयोध्येतील श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचा प्रसाद रामनाथी (गोवा) येथील रामभक्तांना देण्याचे नियोजन होणे

श्री. श्रीराम खेडेकर

‘२२.१.२०२४ या दिवशी अयोध्या येथे झालेल्या श्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या आणि श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सनातन संस्थेच्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ उपस्थित होत्या. सोहळ्याहून परत येतांना त्यांच्या मनात ‘गोव्यातील रामभक्तांना प्रसाद नेऊया’, असा विचार आला. त्याप्रमाणे त्यांनी प्रसादाची पाकिटे बनवून घेतली आणि त्यावर माहिती लिहिलेल्या चिठ्ठ्या लावण्यात आल्या. रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या आसपासच्या घरांत रहाणार्‍या रामभक्तांना प्रसाद देण्याची त्यांची तळमळ असल्यामुळे तो प्रसाद तेथील प्रत्येक घरात देण्याचे नियोजन करण्यात आले.

२. प्रसाद मिळाल्यावर रामभक्तांनी ‘घरबसल्या प्रसाद मिळाला, यासाठी आपण भाग्यवान आहोत’, असे मत व्यक्त करणे

फोंडा (गोवा) येथील साधकांनी प्रसाद वाटण्याची सेवा केली. यामध्ये १० साधक सहभागी झाले होते. साधकांनी रामनाथी आश्रमाजवळील भाग, कवळे, कपिलेश्वरी, पारपती वाडा, नागेशी आणि महालक्ष्मी मंदिराच्या जवळील भाग येथे प्रसाद वाटला. प्रसाद वाटतांना साधकांना भरभरून आनंद मिळाला आणि त्यांना या सर्व घरांतील मंडळींच्या चेहर्‍यावर आनंद पहावयास मिळाला. त्या लोकांनी लगेच कृतज्ञता व्यक्त केली. ‘या लोकांनी अयोध्येहून आपल्या घरापर्यंत प्रसाद पोचवला’, याचे त्यांना आश्चर्य वाटले, तसेच आपल्याला घरबसल्या प्रसाद मिळाला; म्हणून त्यांनी ‘आपण भाग्यवान आहोत’, असे मत व्यक्त केले.

३. एका व्यक्तीने स्वतःजवळील प्रसाद सर्वांना वाटल्याने तोअल्प पडणे आणि गुरुकृपेने त्याला अतिरिक्त प्रसाद मिळणे

एका व्यक्तीने प्रसादाचे पाकीट घेतल्यावर ती ‘सनातनच्या साधकांनी आपल्याला आठवणीने  प्रसाद दिला’, असे सर्वांना सांगत होती. तिने मार्गात भेटलेल्या सर्वांना स्वतःजवळील प्रसाद वाटला. त्यामुळे तिला प्रसाद अल्प पडला. त्याच वेळी मी तेथे प्रसादाचे पाकीट घेऊन पोचलो. तेव्हा त्या व्यक्तीने माझ्याकडे आणखी एक पाकीट मागितले. मी त्याला प्रसादाचे पाकीट दिल्यावर ‘गुरूंनीच तुम्हाला प्रसाद घेऊन पाठवले. हा माझ्यासाठी मोठा चमत्कार आहे’, असे ती व्यक्ती म्हणाली.

४. एका मोठ्या आस्थापनातील कर्मचार्‍यांना प्रसाद दिल्यावर त्यांचा भाव जागृत होणे आणि त्यांनी कृतज्ञता व्यक्त करणे

आम्ही एका मोठ्या आस्थापनाला प्रसादाचे पाकीट दिले. तेथील व्यवस्थापकाने (मॅनेजरने) एका कर्मचार्‍याला तो प्रसाद सर्वांना वाटायला सांगितला. सर्व कर्मचार्‍यांना प्रसाद मिळाला. त्या वेळी ‘आम्हाला  हा प्रसाद रामानेच पाठवला’, असा त्यांचा भाव होता. त्यासाठी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

५. प्रसाद वाटतांना ‘आम्ही आनंद देत आहोत आणि आनंद घेत आहोत’, अशीच साधकांच्या मनाची स्थिती असणे

प्रसाद वाटतांना ‘आम्ही आनंद देत आहोत आणि आनंद घेत आहोत’, अशीच आमच्या मनाची स्थिती झाली होती. यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. श्रीराम खेडेकर, फोंडा, गोवा. (५.२.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक