लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे ७०० वर्षांपूर्वीचे रूप प्राप्त करून देणार्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर विकास आराखड्याच्या कार्यवाहीचे काम पुरातत्व विभागाकडून चालू आहे. या कामासाठी एकूण ७३ कोटी ७५ लाख रुपये संमत झाले आहेत. यात जतन आणि संवर्धन यांसाठी ३५ कोटी ४२ लाख रुपये, मंदिर व्यवस्थापन आणि अभ्यागत सुविधांसाठी १८ कोटी १० लाख रुपये, तसेच इतर अनुषंगिक व्ययासाठी २० कोटी ३३ लाख रुपये व्यय करण्यात येणार आहेत. १५ मार्चपासून हे काम चालू करण्यात आले असून साधारणत: आता १ मास संपत आला आहे. या आराखड्यात मूळ वास्तूशैली आणि बांधकाम यांना धक्का न लावता आधुनिक सुविधा आणि भाविकांना शाश्वत सोयीसुविधा या माध्यमातून पुरवण्यात येणार आहेत. यात्रा, उत्सव यांच्याशी संबंधित सुविधांचा मंदिर परिसरातील नियोजन विचारात घेऊन केले आहे. यात देवस्थान समितीमधील इतर मंदिरांचाही नियोजनात समावेश आहे. तरी या आराखड्यात नेमके काय आहे ? आणि कोणत्या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत त्याचा हा आढावा !
संकलक : श्री. अजय केळकर, कोल्हापूर

१. मंदिराचे दोन भागात करण्यात येणारे काम
साधारणत: मध्ययुगीन काळात बांधण्यात आलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात टप्प्याटप्याने काही बांधकामे करण्यात आली. यात मूळ दगडी फरशी, भिंतीला संगमरवर अन् ग्रॅनाईट दगडाने सुशोभिकरण करण्याचा प्रयत्न झाला; मात्र ग्रॅनाईट लावल्याने गर्भगृहात वायुविजनाचा (हवा खेळती रहाण्याचा) अभाव जाणवू लागला ! त्यामुळे हे काम सध्या आता करण्यात येत आहे. हे काम दोन भागात करण्यात येत आहे.

१ अ. पहिला भाग
१ अ १. जतन आणि संवर्धन :
- प्रस्तावित व्यय : ३५ कोटी ४२ लाख रुपये
- मुख्य मंदिर अन् संकुलातील मंदिरांचे जतन : २४ कोटी १५ लाख रुपये
- देवस्थान आणि अखत्यारितील इतर मंदिरांचे जतन अन् संवर्धन : ११ कोटी २७ लाख रुपये
१ आ. दुसरा भाग : मंदिर व्यवस्थापन आणि अभ्यागत व्यवस्था : १८ कोटी १० लाख रुपये
२. पहिल्या भागाचे जतन आणि संवर्धन
पहिल्या भागाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी पुढीलप्रमाणे व्यय करण्यात येणार आहे.
३. सद्यःस्थिती आणि उपाययोजना
३ अ. नामदेव पायरी आणि महाद्वार अन् पडसाळी यांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रावधानाचे (तरतुदीचे) विवरण : यात प्रामुख्याने झुडुपे अन् गवत शास्त्रीय पद्धतीने काढणे, शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता करणे, दगडाचा भाग तुटला असल्यास दुरुस्त करणे, पुनःवापराच्या अवस्थेत नसल्यास नवीन बांधकाम काढणे, सांध्यातील खराब चुना काम काढणे-सांधे सांधणे, दगडांमधील दर्जे अन् भेगा सांधणे (आवश्यकतेनुसार चुना किंवा स्टील वापरून), अनियोजित आणि हानीकारक जोडण्या काढणे, पाणीगळती थांबवणे, तसेच विसंगत बांधकामाचे स्वरूप पालटणे आवश्यक आहे.
महाद्वारासमोर नामदेव पायरीवर २० व्या शतकाच्या प्रारंभीला घुमटाकार बांधकाम झाले. ही इमारत मूळ मंदिराशी विसंगत शैलीची तर आहेच; पण दोन्ही बाजू महाद्वाराच्या जुन्या भिंतींवर टेकत असल्यामुळे जुन्या बांधकामावर अनावश्यक वजन आल्याची शक्यता आहे. या बांधकामाचे नूतनीकरण करताना संत नामदेव आणि त्यांच्या वंशजांच्या समाध्या असलेल्या पायर्या यांना धक्का लागणार नाही, याची काळजी घेण्यात येईल.

३ आ. सभामंडप : लाकूड कामाची स्वच्छता करणे, लाकूड कामाची दुरुस्ती करणे, अनियोजित जोडण्या आणि बांधकामे काढणे, अलीकडच्या काळातील फरशा काढून जुन्या फरशांची परिस्थितीनुसार पालट करणे, लाकूडकामाला पॉलीश करणे, आपत्कालीन योजनेचा एक भाग म्हणून नगारखाना आणि ओवर्यांचा भाग कोणत्याही कायमस्वरूपी बांधकामाविना मोकळा रहाणे आवश्यक आहे, तसेच जुन्या फरशीवरील शिलालेखांचे दस्तऐवजीकरण (नोंदीकरण) करणे.

३ इ. मुख्य विठ्ठल मंदिर : शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता करणे, खराब अन् खिळखिळे दगड नीट काढून परत लावणे; पुन: वापराच्या अवस्थेत नसल्यास नवीन बांधणे, सांध्यातील खराब चुना काम काढून दर्जे आणि सांधे चुना कामात सांधणे, भेगा सांधणे (आवश्यकतेनुसार चुना किंवा स्टील वापरून), अनियोजित आणि हानीकारक जोडण्या काढणे, पाणीगळती थांबवणे, गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशा, विसंगत बांधकाम काढणे.
३ ई. रुक्मिणी मंदिर आणि मंडप : शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता करणे, तुटलेले दगड काढून पुन्हा बसवणे किंवा नवीन दगड बसवणे, खराब चुना काम काढणे, दगडांमधील दर्जे अन् सांधे चुना कामात सांधणे, भेगा सांधणे, अनियोजित आणि हानीकारण जोडण्या काढणे, पाणीगळती थांबवणे, गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशा, संगमरवर आणि इतर विसंगत बांधकाम काढणे.

३ उ. महालक्ष्मी, बालाजी आणि इतर मंदिरे अन् अन्य इमारती : शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता करणे. तुटलेले दगड काढून पुन्हा बसवणे किंवा नवीन दगड बसवणे, खराब चुनाकाम काढणे. दगडांमधील दर्जे, सांधे-चुनेकामात सांधणे, भेगा सांधणे, अनियोजित आणि हानीकारण जोडण्या काढणे, पाणीगळती थांबवणे, लाकूडकामावरील रंगकाम काढून पॉलीश करणे
४. पहिला भागासाठी करण्यात आलेले प्रावधान आणि करण्यात येणारे काम
देवस्थान समितीच्या अखत्यारीतील इतर २८ मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार आहे, तसेच तटबंदी, पडसाळी/ओवर्या, मारुति मंदिर आणि इतर छोटी मंदिरे, समाध्या अन् दीपमाळा यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने शास्त्रीय पद्धतीने दगडांची स्वच्छता करणे, तुटलेले दगड काढून पुन्हा बसवणे किंवा नवीन दगड बसवणे, सांध्यातील खराब चुना काम काढणे; दगडांमधील दर्जे, सांधे, चुना कामात सांधणे, भेगा सांधणे (आवश्यकतेनुसार चुना किंवा स्टील वापरून), संगमरवरी फरशा अनियोजित जोडण्या काढणे, पाणीगळती थांबवणे आणि लाकूडकामावरील रंगकाम काढून पॉलीश करणे या कामांचा समावेश आहे.

भाग २ व्यवस्थापन

आराखड्याची आवश्यकता !
१. आधुनिक सुविधा पुरवतांना मंदिराचे नियोजन न करता कामे हातात घेतली. मंदिरातील विद्युत्, तसेच सांडपाणी निचरा व्यवस्था २५-३० वर्षे जुनी आहे. सध्या अनेक ठिकाणी वायरी लोंबकळत आहेत. त्यासाठी मंदिराचे सौदर्य वाढवणारी विद्युत् व्यवस्था आवश्यक आहे.
२. मंदिरात आज आपत्ती व्यवस्थापन, तसेच अग्नीरोधक व्यवस्था उपलब्ध नाही. सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साधनांचा अभाव आहे.
३. भाविकांना मंदिराची, तसेच व्यवस्थेची माहिती देण्यासाठी मंदिरात, परिसरात, तसेच शहरात योग्य ठिकाणी कुठेही सुयोग्य माहिती, दिशादर्शक फलक आणि माहिती केंद्रे नाहीत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी असे माहिती फलक आणि केंद्र आवश्यक !
३ मेपर्यंत काम पूर्ण करण्याचा मानस !
– ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष,
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर
वारकर्यांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही हे काम चालू केले असून ३ मेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. कामाची व्याप्ती पहाता ८-१० दिवस हे काम वाढू शकते; मात्र येणार्या आषाढी यात्रेच्या आत वारकर्यांना ७०० वर्षांपूर्वी मंदिर जसे होते तसे पहावयास मिळेल !