सांगली येथे लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक !

कार्यालयावरील ‘काँग्रेस’ शब्द हटवला !

सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

सांगली, १२ एप्रिल (वार्ता.) – महाविकास आघाडीत सांगली येथील लोकसभा निवडणुकीतील जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाच्या इमारतीला रंग देऊन ‘काँग्रेस’ हा शब्द हटवला आहे.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्याचे घोषित केले, तर ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी सांगली जिल्ह्याचे सर्व नेते आणि पदाधिकारी यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेऊन ‘महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडणे हा निर्णय आपल्याला पचनी पडलेला नाही’, असे म्हटले आहे.

‘महाविकास आघाडीकडून अधिकृतपणे ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील हेच अधिकृत उमेदवार असतील’, असे घोषित करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी थेट त्यागपत्र देण्यास प्रारंभ केला आहे. मिरज तालुक्याची काँग्रेसची समिती विसर्जित करण्यात आली आहे. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या सिद्धतेत आहेत का ? अशी चर्चा चालू आहे.