भारतीय सैन्याचे एक विशेष पथक (युनिट) ‘स्टेग’ !

(‘स्टेग युनिट’ : भविष्यातील विघटनकारी तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी समर्पित असे एक विशेष तंत्रज्ञ पथक आहे.)

भविष्यातील युद्धांमध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल. लढाईत युनिट्स आणि फॉर्मेशन्सना समर्थन देण्यासाठी आधुनिक युद्धात नवीन उपकरणे समाविष्ट करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील अशी प्रगती आत्मसात् करण्यासाठी भारतीय सैन्याने ‘सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अँड अडॉप्शन ग्रुप’ (स्टेग) हे ‘ग्राऊंड ब्रेकिंग’ (एक क्रांतीकारक शोध जो उद्योग किंवा समाज यांची लक्षणीय प्रगती करतो) तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ पथक सिद्ध केले आहे. ते ‘डिजिटल डोमेन’मध्ये (स्वतःच्या संकेतस्थळाचे नाव) त्याच्या क्षमतांना बळ देणारे ठरणार आहे.

‘स्टेग युनिट’चे प्रातिनिधिक छायाचित्र

१. ‘स्टेग’ पथकाचे कार्य आणि तिचे उद्दिष्ट

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या पालटांमुळे कुठले शस्त्र घ्यायचे ? त्या शस्त्राला सैन्यात केव्हा सामील करायचे ? आणि असे करतांना सर्वांत अत्याधुनिक; पण अल्प मूल्यात असे तंत्रज्ञान आपल्या सैन्यामध्ये कसे येईल ? हे ठरवणे अन् ते आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. याकरता भारतीय सैन्याने ‘स्टेग युनिट’ असे एक नवीन पथक स्थापन केले आहे. भारतीय सैन्यात विघटनकारी तंत्रज्ञान (Disruptive, Niche Technologies), म्हणजे ‘एआय’ (कृत्रिम बुद्धीमत्ता), ‘५ जी’, ‘६ जी’, ‘क्वांटम’ तंत्रज्ञान यांसह अन्य अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर संशोधन केले जात आहे.

‘स्टेग’ पथक भविष्यातील विघटनकारी तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी समर्पित असे एक विशेष तंत्रज्ञान ‘युनिट’ आहे. ‘स्टेग’ लष्कराच्या ‘सिग्नल संचालनालया’च्या अंतर्गत काम करील आणि ‘कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’मधील कर्नल त्याचे नेतृत्व करतील. या पथकामध्ये अनुमाने २८० कर्मचारी असतील. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट ‘कठोर मूल्यमापन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराच्या क्षमतांना चालना देणे’, हे आहे. ‘स्टेग’ हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करणार असल्याने एकूण कार्यक्षमता वाढवणे, हे त्याचे उद्दिष्ट असेल.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. लष्कराला सर्वांत प्रगत साधने उपलब्ध करून देणे हे ‘स्टेग युनिट’चे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट !

‘स्टेग युनिट’ हे तारा (वायर्ड) आणि बिनतारी (वायरलेस) तंत्रज्ञान अद्ययावत् करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या युनिटच्या माध्यमातून भारतीय सैन्यासाठी ‘मोबाईल ॲप’ आणि वेब (संकेतस्थळे) इत्यादी विकसित केली जाणार आहेत. ‘स्टेग युनिट’ वेगाने पालटणार्‍या सध्याच्या युद्धाकरता सिद्ध रहाण्यासाठी आणि भविष्यकालीन युद्धभूमीचा विचार करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यासाठी ‘वायर्ड’ आणि ‘वायरलेस सिस्टम कम्युनिकेशन’ (बिनतारी संपर्क यंत्रणा) आवश्यक आहे.

भ्रमणभाष संपर्क प्रणालीच्या व्यतिरिक्त ‘सॉफ्ट डिफाइंड रेडिओ’ (रेडिओ संपर्क प्रणाली), इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, ५ जी आणि ६ जी नेटवर्क, क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन र्लांनग इत्यादी विकसित केले जात आहेत. यासाठी भारतीय सैन्य उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी भागीदारी करणार आहे. हे ‘हायटेक युनिट’ (उच्च तंत्रज्ञानयुक्त पथक) तांत्रिक ‘स्काऊंटिंग’ (हेर), मूल्यांकन, विकास, ‘कोअर आयसीटी’ (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील) उपायांचे व्यवस्थापन करणार आहे. याचसमवेत जगात उपलब्ध समकालीन तंत्रज्ञानाची सुधारणा करून भारतीय सैन्याला तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे घेऊन जाणार आहेत. ‘स्टेग युनिट’ भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करणार आहे. क्षेत्राचे पालटते स्वरूप लक्षात घेऊन लष्करी वापरासाठी शिक्षण, क्वांटम संगणक विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सोल्युशन्स’चा (उपाययोजनांचा) लाभ घेणे आणि शैक्षणिक, उद्योग यांच्या सहकार्याने चांगले तंत्रज्ञान सिद्ध करणे, हे ‘स्टेग’चे उद्दिष्ट आहे. उद्याचे युद्धक्षेत्र सुरक्षित आणि मजबूत दळणवळण प्रणालींवर अधिकाधिक अवलंबून आहे. पारंपरिक पद्धतींना सतत नवीन आव्हाने निर्माण होत आहेत.

‘स्टेग’चे उद्दिष्ट आहे की, लष्कराला सर्वांत प्रगत साधने उपलब्ध आहेत, याची खात्री करणे. हा उपक्रम केवळ नवीन तंत्रज्ञान आत्मसात् करण्यापलीकडे जातो. आधुनिक युद्धामध्ये संपूर्ण रणांगणावर उच्च प्रमाणात माहितीची देवाण-घेवाण आणि ‘रिअल टाईम’ (वास्तविक वेळेच्या) समन्वयाची आवश्यकता असते. सुरक्षित आणि विश्वासार्ह संपर्क यंत्रणा, प्रभावी आदेश अन् नियंत्रणासाठी सर्वोपयोगी आहे.

३. भारतीय सैन्याच्या दृष्टीने ‘स्टेग’ची भूमिका महत्त्वपूर्ण

काही प्रगत देशांची अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मक्तेदारी आहे. ‘स्टेग’सह भारताने संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पहिले; पण धाडसी पाऊल उचलले आहे. ‘स्टेग’ची स्थापना लष्कराच्या व्यापक आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांशी जुळते. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यांच्या तत्त्वांशी अनुरूप ‘स्टेग’ एकीकडे सशस्त्र दल अन् दुसरीकडे उद्योग, शैक्षणिक क्षेत्राचे साहाय्य घेऊन आपल्या उणिवा न्यून करण्यास साहाय्य करील. उच्च श्रेणीतील तंत्रज्ञान हे देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे, तसेच ते आत्मसात् केल्यास त्यांना अधिक स्वयंपूर्ण करणार आहेत. दळणवळण हा लष्करी मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘स्टेग’ने हाती घेतलेल्या विशिष्ट प्रकल्पांचे तपशील सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात आहेत; मात्र हे नक्की की, हे ‘युनिट’ अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

४. शत्रूवर मात करण्यास लाभदायी

युद्धक्षेत्रासाठी वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये उत्तम तंत्रज्ञान आणि माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी पूर्ण भारतीय सैन्याला जोडण्याची क्षमता असणे, हेसुद्धा पाकिस्तान अन् चीन यांवर मात करण्यास लाभदायी ठरणार आहे. चिनी सैन्य ‘६ जी’ तंत्रज्ञान अंगीकारत असून भारतातही त्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘६ जी’ तंत्रज्ञानामुळे मानवरहित लष्करी मालमत्तेवर ‘ऑपरेटर’च्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे नियंत्रण ठेवता येणार आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे