सांस्कृतिक भारतासाठी पंचांग बहुमोल !

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगाचे पूजन केले जाते. पंचांग हे हिंदु संस्कृती संवर्धक आहे. एका शब्दात सांगायचे, तर ते प्राचीन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र आहे. ज्या काळात जग लज्जारक्षणाचे साधने शोधत होते, तेव्हा भारतात सूर्य, चंद्र आणि इतर ग्रह यांची नेमकी स्थिती सांगितली जात होती. कोणत्या गावी सूर्योदय वा चंद्रोदय कोणत्या वेळी होईल, हे अचूक सांगितले जात होते. सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, ग्रह युती, ग्रहांची गती; त्यानुसार त्यांचे पृथ्वी आणि मानवी जीवन यांवर होणारे परिणाम हे सांगितले जात होते. हे सारे केवळ गणितीय सूत्रांद्वारे होत होते. मोठमोठ्या दुर्बिणींची आवश्यकता नव्हती. असे हे पुरातन आणि नित्य नूतन खगोलशास्त्र कालमापनाचे अद्भुत एकक आहे.

मानवी जीवनासाठी पंचांग उपयोगी

श्री. किशोर पौनीकर

यातून मोठ्यात मोठा आणि सूक्ष्माती सूक्ष्म काळ यात मोजता येतो. यातूनच अमुक एका राशीत चंद्र असतांना त्या वेळी जन्मलेल्या मनुष्याचे जन्माच्या ठिकाणचे अक्षांश-रेखांश बघत त्याला जीवन जगणे सुलभ व्हायला शुभ-अशुभ कालावधी ठरवला जाऊ लागला. जीवनातील सुगम आणि खडतर काळ हे सारे पूर्वानुमान सांगता येऊ लागले. तिथी, नक्षत्र, योग, करण हे सर्व लक्षात घेऊन व्यक्तीगत जीवनाला खगोलाशी जोडले. शेत नांगरणे, पेरणी, कापणी यांचे नक्षत्र हे पाळले गेले की, उत्पादन खर्च एकदमच अल्प येतो.

पंचांगातून अनेक प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक मार्गदर्शन !

भारताची हे सांस्कृतिक वैभव तोडण्याचे काम इंग्रजांच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या नावाखाली झाले आहे. ‘पुरोगामी म्हणजे सांस्कृतिक वैभव नाकारणारा’, अशीच स्थिती दिसून येते. त्यामुळे केवळ यांत्रिकता, म्हणजेच आधुनिकता ठरवली गेली. खगोलाशी संबंध नसणारी कालगणना प्रचलित झाली. ज्यांना ही इंग्लंड आणि अमेरिका यांची मनोगुलामी झुगारायची असेल, त्यांनी पंचागाशी जवळीक करावी. आपोआपच लक्षात येईल की, शोषित जागतिकीकरण (Exploited Globalisation) हवे ? कि सहोदर भावात्मक विश्वबंधुत्व असावे ? या पंचांगातून अनेक प्रकारचे सांस्कृतिक आणि धार्मिक मार्गदर्शन होत असते. एरव्ही सारे पाश्चात्त्य विचारांना फसतात.

नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी पंचांगाची पूजा करायची असते आणि नंतर त्या नवसंवत्सराचा फलादेशाचे वाचन आणि श्रवण करायचे असते. आपल्याला सांस्कृतिक भारत हवा असेल, तर प्राचीन संस्कृतीला त्याच पद्धतीने आणि शास्त्राने अभ्यासावे लागेल. त्यासाठीही पंचांग बहुमोल आहे.

– श्री. किशोर पौनीकर नर्मदापूरकर, नागपूर. (८.४.२०२४)