१. स्वतःचे दुखणे विसरून सेवारत रहाणे
‘सद्गुरु सत्यवान कदम यांचा एक हात मागील काही मासांपासून दुखत आहे, तरीही ते स्वत:ची कामे स्वतःच करतात आणि सेवारत असतात. साधकांना आध्यात्मिक त्रास होत असल्यास सद्गुरु सत्यवानदादा साधकांना नामजपादी उपाय सांगतात. ‘ते स्वतःचे दुखणे सेवा करतांना विसरून जातात’, असे मला वाटते.
२. ते प्रत्येक कार्यपद्धतीचे पालन तंतोतंत करतात.
३. साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव प्रेमाने करून देणे
सद्गुरु दादा सत्संगात साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव प्रेमाने करून देतात. ते घेत असलेल्या सत्संगात आनंद मिळतो.
४. सद्गुरु सत्यवानदादांनी साधिकेला तिच्यातील स्वभावदोषामुळे होणारा त्रास जाणून तिला ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची जाणीव करून देणे आणि ‘हा स्वभावदोष घालवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’ हेही सांगणे
मला काही साधकांविषयी पूर्वग्रह होता. मला ‘त्यांच्याशी बोलू नये’, असे वाटत होते. ‘मला त्रास होत होता’, हे सद्गुरु सत्यवानदादांनी जाणले आणि त्यांनी मला ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषाची जाणीव करून दिली, तसेच त्यांनी मला ‘हा स्वभावदोष घालवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हेही सांगितले.
सद्गुरु दादांनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यावर माझ्या मनातील पूर्वग्रह दूर होऊन त्या साधकाशी बोलतांना मला आनंद वाटू लागला.
५. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
५ अ. सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याच्या एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध येणे : एकदा मी सद्गुरु सत्यवान कदम यांच्या खोलीतील पाण्याची भांडी आणण्यासाठी गेले होते. ती भांडी स्वयंपाकघरात आणल्यावर मला त्यातील एका भांड्यात असलेल्या पाण्याला अष्टगंधाचा सुगंध आला. मी त्याविषयी अन्य २ साधकांना सांगितले. तेव्हा त्यांनीही ‘त्या पाण्याला सुगंध येत आहे’, असे सांगितले. मी ती भांडी स्वच्छ धुतली आणि पुसून ठेवली, तरीही त्या भांड्यांना सुगंध येत होता.
५ आ. मला सद्गुरु सत्यवान कदम यांना पाहिल्यावर पुष्कळ आनंद जाणवतो.
६. सद्गुरु सत्यवान कदम निवास करत असलेल्या खोलीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
६ अ. ‘सद्गुरु दादांच्या खोलीतील पलंग, कपाट, पटल, आसंदी आदी सर्व वस्तू सद्गुरु दादांमधील चैतन्यामुळे आनंदी आहेत’, असे मला जाणवले. ‘सद्गुरु दादा पूर्वी वापरत असलेला पलंग सजीव झाला आहे’, असे मला जाणवते.
६ आ. सद्गुरु दादांच्या खोलीतील खिडकीच्या काचा पारदर्शक झाल्या आहेत.
६ इ. सद्गुरु दादांच्या खोलीतील कपाटाचा आरसा : सद्गुरु दादांच्या खोलीतील कपाटाच्या आरशात आपतत्त्व निर्माण झाले आहे. मी त्या आरशात पाहिल्यावर ‘माझ्यावरील आवरण दूर होते. आरसा जणू काही निळा सागर आहे आणि त्यामध्ये डुंबून रहावे’, असे मला वाटते.
६ ई. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी वापरलेला पलंग सद्गुरु सत्यवानदादांच्या खोलीत ठेवल्यावर जाणवलेली सूत्रे
६ ई १. पलंग व्यवस्थित ठेवल्यावर ‘गुरुदेवांचा पलंग असल्याने खोलीची रुंदी वाढली’, असे वाटणे : सद्गुरु दादांसाठी गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) वापरलेला पलंग आणला होता. तेव्हा मला आनंद झाला. मला वाटले, ‘सद्गुरु दादांच्या खोलीत जागा अल्प असल्याने तो पलंग त्या खोलीत मावणार का ?’; मात्र साधकांनी थोडा प्रयत्न केल्यावर त्यांना पलंग खोलीत नेता आला. त्या वेळी ‘गुरुदेवांचा पलंग असल्याने खोलीची रुंदी वाढली’, असे मला वाटले.
६ ई २. पलंग सद्गुरु दादांच्या खोलीत ठेवल्यानंतर खोलीतील चैतन्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचे जाणवते.
६ ई ३. पलंगावर पुष्कळ दैवी कण आढळणे : मी सद्गुरु दादांच्या खोलीची स्वच्छता करण्याची सेवा करते. गुरुदेवांचा पलंग आणल्यानंतर खोलीची स्वच्छता झाल्यानंतर मी पलंगाला हात लावून आणि डोके टेकवून नमस्कार केला. तेव्हा माझ्या हाताला दैवी कण लागले, तसेच मला पलंगावर सगळीकडे दैवी कण दिसले. त्या पलंगावर पुष्कळ दैवी कण असतात.
६ उ. सद्गुरु सत्यवानदादांच्या खोलीची स्वच्छता करतांना पुष्कळ आनंद मिळणे आणि भूकेची जाणीव न होणे : सद्गुरु सत्यवानदादांच्या खोलीची स्वच्छता करतांना मला पुष्कळ आनंद मिळतो. एक दिवस मला भूक लागली होती; परंतु खोलीची स्वच्छता केल्याविना महाप्रसाद घ्यायला मन सिद्ध नव्हते. ‘खोलीची स्वच्छता करण्यापूर्वी महाप्रसाद घेतला, तर मनाला समाधान मिळणार नाही’; म्हणून मी स्वच्छतेला प्राधान्य दिले. त्या वेळी सेवा करतांना मला आनंद मिळाला अन् भुकेची जाणीवही नाहीशी झाली. खोलीची स्वच्छता झाल्यानंतर ‘जेवणाची आवश्यकता नाही’, असे माझ्या लक्षात आले.
६ ऊ. सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्रास उणावणे आणि सेवा करतांना आनंद मिळणे : वर्ष २०२१ मध्ये मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. त्या वेळी ‘मला आध्यात्मिक त्रास होत आहे’, हे मला इतरांना सांगताही येत नव्हते. माझे शरीर दुखत होते. मला खाली बसता येत नव्हते. ‘मी काय करते ?’ हे मलाच कळत नव्हते. त्या वेळी सद्गुरु सत्यवानदादांनी मला नामजपादी उपाय सांगितले. मी त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय सातत्याने केल्यानंतर माझा त्रास न्यून झाला आणि मला सेवा करतांना आनंद मिळू लागला.
६ ए. सद्गुरु सत्यवानदादांनी दिलेला नामजप केल्यावर दाढ काढतांना त्रास न होणे : माझ्या २ दाढा किडल्या होत्या. मी गोवा येथे माझ्या घरी असतांना त्या काढण्यासाठी दातांच्या डॉक्टरांकडे गेले; मात्र २ वेळा मला अडचणी आल्या आणि पुष्कळ भीती वाटली. मी कुडाळ सेवाकेंद्रात आल्यावर सद्गुरु दादांना याविषयी सांगितले. तेव्हा सद्गुरु दादांनी मला नामजप शोधून दिला. मी दाढ काढण्यापूर्वी नामजप केला, तसेच दाढ काढतांनाही नामजप चालू ठेवला. त्या वेळी कोणतीही अडचण न येता, कसला त्रास न होता २ – ३ मिनिटांत दाढ काढली गेली.’
– सौ. जयंती परब, कुडाळ सेवाकेंद्र, पिंगुळी, सिंधुदुर्ग. (६.९.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |