Pradeep Sharma : माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला स्थगिती

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा

मुंबई – माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, तसेच त्यांच्या याचिकेवरील सुनावणीलाही न्यायालयाने ४ आठवड्यांसाठी स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे पुढील निर्देश मिळेपर्यंत प्रदीप शर्मा यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

लखन भैय्या याला चकमकीत ठार केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषी ठरवून १९ मार्च या दिवशी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला प्रदीप शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालायात आव्हान दिले होते. जन्मठेपेची शिक्षा दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना न्यायालयाला शरण येण्याचे आवाहन केले होते. यालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्य सरकारकडून या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात म्हणणे मांडावे लागणार आहे. लखन भैय्या हत्येप्रकरणी वर्ष २०१३ मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने प्रदीप शर्मा यांना दोषमुक्त ठरवले. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रहित करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.